
Ahmednagar : सहकार चळवळ सामान्यांची शक्ती
श्रीगोंदे : बड्या बँकेत लंगोटी घालून गेलेल्या माणसाला सन्मान मिळत नाही. तेथे फक्त सुटाबुटातील व्यक्तीलाच सन्मान मिळतो. त्यामुळे सहकारी बँका व पतसंस्थांचाच सामान्यांना आधार आहे. लोकांच्या जिवावर उभी राहिलेली सहकारी चळवळ गावातील सामान्यांची शक्ती असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.
काष्टी येथील महेश्वर मल्टिस्टेट व सहकारी पतसंस्थेने उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार होते. आमदार बबनराव पाचपुते, आमदार अशोक पवार, आमदार नीलेश लंके, महेश्वरचे अध्यक्ष दत्तात्रेय गावडे, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, काकासाहेब कोयटे, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, राजेंद्र फाळके, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, राकेश पाचपुते, दीपक भोसले उपस्थित होते.
पवार म्हणाले, की दत्तात्रेय गावडे या शिक्षकी पेशातील माणसाने सहकाराच्या माध्यमातून सामान्यांना ताकद देण्याचे काम केले. राज्यात वैकुंठभाई मेहता यांनी उभी केलेली सहकार चळवळ पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी वाढविली. या चळवळीला त्यांनी दिशा देत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. ही चळवळ सामान्यांची खरी ताकद आहे. कारण, बड्या बँकांमध्ये सामान्यांना किंमत नाही. तेथे सुटाबुटातील व गळ्यात टाय असणाऱ्यांनाच खुर्ची मिळते. सहकारात मात्र सामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्परता दाखविली जाते.
घनश्याम शेलार म्हणाले, की शरद पवार यांनी कायमच श्रीगोंद्यातील प्रश्नांकडे लक्ष दिले आहे. कुकडीचे न्याय्य पाणी मिळावे यासाठी माणिकडोह ते डिंभे धरणादरम्यानच्या बोगद्याचा प्रश्न त्यांच्यामुळेच मार्गी लागत आहे. प्रास्ताविक दीपक भोसले यांनी केले, दत्तात्रेय गावडे यांनी आभार मानले.
अनेक ठिकाणी शंका
पवार म्हणाले, की केंद्र सहकारात नवा कायदा आणत आहे. काही गोष्टी चांगल्या असल्या, तरी अनेक ठिकाणी शंका आहेत. त्यात गावातील सहकारी संस्थेला रुग्णालय काढावे लागणार आहे. गावाची सोसायटी असे रुग्णालय काढू शकेल का, त्यासाठी लागणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कसे उपलब्ध करणार, हे प्रश्न आहेत. त्यातच, जर त्या रुग्णालयात रुग्णाच्या बाबतीत काही घटना घडली, तर गाव टोकाची भूमिका घेऊ शकते, अशी भीती वाटते.