निघोजला मळगंगा देवीचा नवरात्र उत्सवास प्रारंभ

अनिल चौधरी
Saturday, 17 October 2020

यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पहाटेची पूजा अर्चा तसेच सकाळ सायंकाळ  महाआरतीसाठी फक्त देवीचे पुजारी व गोंधळी यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून ही संख्या शासकीय नियमानुसार फक्त पाच असणार आहे.

निघोज (नगर) : राज्यातील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या माता मळगंगा देवीची घटस्थापना निघोज येथील मंदिरात पूजा अर्चा करून करण्यात आली. यावेळी पोपट महाराज देशपांडे यांनी मंत्रोच्चार करीत पूजा केली. यावेळी देवीचे पुजारी सुनिल गायखे उपस्थित होते.

घटस्थापनेला सारीका गायखे, सुवर्णा गायखे, संध्या गायखे, देवयानी गायखे, दुर्वा गायखे, दर्शना गायखे आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. पहाटे पुजारी सुनिल गायखे यांनी पुजाअर्चा केली व घटस्थापनेची पूर्ण तयारी केली. पहाटे साडेपाच वाजता देवीचे गोंधळी दुणगुले बंधू यांनी संबळ वाजवीत महाआरती केली. कोरोना पार्श्वभूमीवर सध्या गेली सहा महिने मंदिर बंद असल्याने सामाजिक अंतर ठेवून देवीची पूजा अर्चा व महाआरती करण्यात येते.

यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सव निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पहाटेची पूजा अर्चा तसेच सकाळ सायंकाळ  महाआरतीसाठी फक्त देवीचे पुजारी व गोंधळी यांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून ही संख्या शासकीय नियमानुसार फक्त पाच असणार आहे. संध्याकाळी महाआरतीच्या वेळी जे भाविक उपस्थित राहतील त्यांना मंदिराबाहेर सामाजिक अंतर ठेवून महाआरतीसाठी परवानगी राहील. मात्र मंदिराबाहेर गर्दी केली जाणार नाही, याची दक्षता भाविकांनी घेण्याची गरज आहे. आठव्या माळेला देवीच्या होमाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. मात्र यावेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

कुंडस्थळी असलेल्या मळगंगा मंदिरातही हीच दक्षता घेण्यात येणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सव व दसरा पालखी सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी लाखो भक्तगण राज्यातून मोठय़ा संख्येने निघोज येथे असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी मर्यादीत भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी भावीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रामस्थांनी केले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratra festival of Goddess Malganga has started in Nighoj village