शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीची नगरमध्ये व्हर्च्युअल रॅली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 December 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार 12 डिसेंबरला 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

अहमदनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार 12 डिसेंबरला 80व्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली सहा दशके शरद पवार राजकारणाशी निगडीत आहेत. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते शरद पवार यांची भेट घेतात.

पण यंदा कोरोना स्थिती असल्याने शरद पवार यांचा व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादी नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेतून दिली. 

फाळके म्हणाले, शरद पवार यांचा वाढदिवस यंदा एका अनोख्या व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी 12 डिसेंबरला सकाळी 11 वाजता ही रॅली सुरू होणार आहे.

शरद पवार मुंबईतून या ऑनलाईन रॅलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. या शिवाय काही ठराविक जिल्ह्याच्या ठिकाणांचे थेट प्रक्षेपणही होईल. राज्यातील 36 जिल्हे व 350 पेक्षाही जास्त तालुक्‍यात व्हर्ल्युअल रॅलीचा कार्यक्रम होईल. यावेळी पक्षाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्‌घाटन होईल. या संकेतस्थळातून पक्षाच्या सभासदत्त्वाचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. राज्यातील मंत्री नवाब मलिक व दिलीप वळसे पाटील काही महत्त्वाच्या योजना जाहीर करतील. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते आदिवासींना कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.

पक्षातर्फे शरद पवार यांच्यावर लघुपट व माहितीपट तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण यावेळी होईल. शिवाय राष्ट्रवादीसाठी चांगले काम करणाऱ्या तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांचाही यावेळी गौरव होईल. नगर तालुका राष्ट्रवादीचा कार्यक्रम राष्ट्रवादी भवनमध्ये राहील. कर्जतमधून एनसीसीचे एक पथक बारामतीला जाणार आहे. याशिवाय राज्यातील कमी पडत असलेला रक्‍तसाठा लक्षात घेता 13 ते 20 डिसेंबर या कालावधीत रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांत सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करण्यात येईल. 

पारनेरचा निर्णय स्थानिक पातळीवर 
जिल्ह्यातील चार ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. यातील तीन ठिकाणी महाविकास आघाडी निवडणूक लढवेल. पारनेरमध्येही महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र सर्व निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा नेत्यांना देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्पष्ट केले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP virtual rally in the city on the occasion of Sharad Pawar birthday