esakal | नगर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचाच झेंडा! अध्यक्षपदी उदय शेळके, उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे
sakal

बोलून बातमी शोधा

NCP's flag on Nagar District Bank! Uday Shelke as President

नगर जिल्हा बँकेवर अखेर दोन्ही काँग्रेसने वर्चस्व अबाधित ठेवले आहे.

नगर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी-काँग्रेसचाच झेंडा! अध्यक्षपदी उदय शेळके, उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर ः अहमदनगर जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसनेच झेंडा फडकावला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांमुळे जिल्हा बँकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच सत्ता अबाधित राहिली.

बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उदय शेळके यांना संधी मिळाली आहे. तर थोरात गटाचे माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले.

शेळके हे पारनेरचे संचालक आहेत. इतर संचालक बिनविरोध निवडले गेले होते. परंतु त्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागले. जीए महानगर बँकेचे ते सर्वेसर्वा आहेत. आता त्यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर संधी देण्यात आली. बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

भाजपवर नामुष्की

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत भाजपने बँकेवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फसला. नंतर माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेच थोरात गटाकडे आले. त्यामुळे भाजपच्या आव्हानाची हवाच निघून गेली.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते काही तरी करामत करतील असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. 

अशा घडल्या घडामोडी

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेमध्ये चढाओढ लागली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सुरूवातीपासून या पदावर त्यांचा दावा होता. एकंदर जिल्हा बँकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ बँकेवर थोरात-घुले कुटुंबाचेच वर्चस्व राहिले. अपवाद वगळता विखे पाटील कुटुंब बँकेच्या सत्तेत नव्हते.

या निवडणुकीत बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी आणि उपाध्यक्षपद काँग्रेसकडे असे ठरले होते. अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप, चंद्रशेखर घुले, आमदार आशुतोष काळे यांच्या नावावर चर्चा झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून उदय शेळके आघाडीवर आले. आणि त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले. 

निवडीपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या बंगल्यावर बैठक झाली. त्यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. संचालक मंडळाच्या बैठकीवेळी चंद्रशेखर घुले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले,माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अण्णासाहेब म्हस्के, अरूण तनपुरे आदी उपस्थित होते.

loading image