Ahmednagar News: चारित्र्यहननाला महत्त्व नको :नीलम गोऱ्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar News, Neelam Gorhe News

Ahmednagar : चारित्र्यहननाला महत्त्व नको :नीलम गोऱ्हे

अहमदनगर : राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांची चिखलफेक केली जात आहे. सर्व राजकीय पक्षांनी संयम बाळगला पाहिजे. राजकारणात चारित्र्यहनन हे हत्यार म्हणून वापरले जात आहे. चारित्र्यहननाला फारसे महत्त्व देऊ नये, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. (Neelam Gorhe News)

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की राजकीय नेत्यांकडून सातत्याने एकमेकांचे चारित्र्यहनन केले जाते. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचेही चारित्र्यहनन अशाच पद्धतीने केले जात आहे. एखाद्याने आत्महत्या केली असली, तरी त्याला खून म्हटले जाते. त्यामुळे चारित्र्यहनन करणाऱ्यांना महत्त्व देऊ नये.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे सर्व्हे केले जातात. मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांना सर्वेक्षणात कदाचित प्रतिकूल अभिप्राय मिळत असेल. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात असतील. अपयशाच्या भीतीमुळे भाजपकडून निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

उपसभापती असल्याने सत्ताधारी पक्षांचे अनेक मंत्री आपल्याला भेटतात. या भेटी प्रशासकीय स्वरूपाच्या आहेत. अधिवेशन काळात कोणते विधेयक अगोदर घ्यायचे, या अनुषंगाने या भेटी असतात. या भेटी राजकीय स्वरूपाच्या नाहीत, असेही त्या शेवटी म्हणाल्या.

केडगाव हत्याकांडाचा पाठपुरावा

अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावातील पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या शिवसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. या गुन्ह्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्तीही करण्यात आली आहे. खटला वेगाने चालविला पाहिजे. या खटल्याचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनाच साथ

आपण शिवसेनेत गेल्या २४ वर्षांपासून कार्यरत आहोत. आपल्या पक्षाने राजकीय संजीवनी दिली. आपल्याकडे साधा कारखाना किंवा कोणता मोठा समाज पाठीशी नाही, तरीही पक्षाने सन्मानाची वागणूक आणि महत्त्वाची पदे दिली आहेत. आपण कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बांधील आहोत.