नेहरू पुतळा उद्यानाभोवतीचे अतिक्रमण हटवले

अमित आवारी
Tuesday, 12 January 2021

शहरातील लाल टाकी परिसरात नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात पाण्याची टाकी, नेहरू पुतळा व उद्यान झाले होते.

नगर ः शहरातील कॉंग्रेस कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लाल टाकी परिसरातील नेहरू उद्यानाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. शहर कॉंग्रेसने पाठपुरावा केल्यानंतर अखेर महापालिकेकडून आज या उद्यानाची सफाई करण्यात आली. अतिक्रमणे व होर्डिंग्ज हटविण्यात आल्यामुळे नेहरू उद्यानाचा श्‍वास आज मोकळा झाला. 

शहरातील लाल टाकी परिसरात नवनीतभाई बार्शीकर यांच्या काळात पाण्याची टाकी, नेहरू पुतळा व उद्यान झाले होते. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दुरवस्था झाली. अक्षरश: काही जण या उद्यानाचा शौचालय म्हणून वापर करीत होते. तेथे तळीरामांचे अड्डे झाले होते.

पंडित नेहरू यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसचे कार्यालय या उद्यानापासून हाकेच्या अंतरावर असताना, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कधी लक्ष दिले नाही. याबाबत "सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच, सामाजिक संघटनांनी उद्यानात स्वच्छता मोहीम राबविली. 

माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी उद्यानात दिवे बसविले. शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जाग आल्यावर उद्यानातील सफाई, होर्डिंग व अतिक्रमणे हटविण्याबाबत महापालिकेत त्यांनी मागणी केली. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण काळे व स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानंतर महापालिकेने आज तेथील होर्डिंग हटविले, तसेच उद्यानाच्या संरक्षक भिंतीलगतची अतिक्रमणे काढली. कधी नव्हे ते महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांसह पथकाने या उद्यानाची स्वच्छता केली.

उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे व उपायुक्‍त संतोष लांडगे यांनी आज या कामाची पाहणी केली. महापालिकेत आज दुपारी जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले यांनी बैठक बोलाविली होती. तीत उद्यानाच्या विकासाबाबत चर्चा झाली. 

शहरातील 50 टक्‍के फलक अनधिकृत 
पंडित नेहरू उद्यानासमोरील होर्डिंग हटवीत असताना, महापालिका अधिकाऱ्यांना त्यांतील दोन होर्डिंग अनधिकृत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दोन्ही उपायुक्‍तांनी शहरातील होर्डिंगची माहिती घेतली असता, 50 टक्‍के होर्डिंग अनधिकृत असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसूल बुडत असल्याचे समोर आले. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nehru removed the encroachment around the statue park