तरुणाई पोलिस भरतीच्या प्रतिक्षेत; मुंबई, पुण्यातून आलेले तरुणांचे शेतीत नवनवीन प्रयोग

गौरव साळुंके
Saturday, 29 August 2020

ग्रामीण भागातुन कामानिमित्त पुणे- मुंबई सारख्या महानगरात गेलेली तरुणाई कोरोनाच्या धास्तीने गावाकडे रमली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : ग्रामीण भागातुन कामानिमित्त पुणे- मुंबई सारख्या महानगरात गेलेली तरुणाई कोरोनाच्या धास्तीने गावाकडे रमली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण गावाकडे राहुन शेतीक्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवित आहे.

शेतमालाच्या विक्रीत शेतकऱ्यांची लुट होत असल्याने शेतीकामातुन वेळ काढुन पोलिस भरतीसाठी ग्रामीण भागातील तरुणाई मैदानी सराव करीत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लवकरच पोलिस भरती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

सरकार स्थापनेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. आणि राज्याच्या गृह खात्याचे सुत्र मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आले. निवडणुकीनंतर राज्य कारभार रुळावर येताना चीनमध्ये सुरु झालेला कोरोनाचा संर्सग राज्यासह देशभरात पसरला. पाच महिन्यापासुन प्रशासन आणि नागरीक कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या संकटात अनेक अडचणीचा सामोरे जावे लागले. 

कोरोनाने सामान्यांचे जीवन बदलले आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले तर काहींची उपासमारीची झाली. राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगार तरुण पोलिस भरती प्रक्रियेसह सरकारी व खासगी नोकरीच्या शोधात आहे. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे. ग्रामीण भागातील तरुणाई सध्या पहाटे व सायंकाळी रस्त्याच्याकडेला धावण्याचा सराव करीत आहे.

सरकारच्या माहितीनुसार पोलिस भरती लवकरच होणार असल्याने शेकडो तरुणांनी मैदानी सरावाकडे लक्ष दिले आहे. भर्ती निघाल्यानंतर महिनाभरात मैदानी चाचणी घेतली जाते. मैदानी सरावासाठी सातत्य आणि मोठा कालावधी लागतो. त्यामुळे भरती लवकरच निघेल अशी आशा ठेवुन शेकडो तरुण सध्या मैदानी सरावासाठी रस्त्याच्याकडेला धावत आहे. ग्रामीण भागात शेतीसह शेतीपुरक व्यवसाय केले जातात.

नगर जिल्यात दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गायीचे पालन करुन दुध व्यवसायातुन कुटूंबाला आर्थिक आधार मिळतो. गायीना चारा-वैरण करुन शेतीकामातुन मिळालेल्या वेळेत तरुण लेखीचा सराव करतात. दिवसभर शेतीकामे आणि रात्री स्वयं-अध्ययनासह पहाटे व सायंकाळी मैदानी सरावा असा दिनक्रम ग्रामीण भागातील तरुणाईचा आहेत.

मातुलठाण येथील जगदीश बोर्डे म्हणाले, शेतीकामे करुन मिळालेल्या वेळेत पोलिस भरतीची तयारी करीत आहोत. कोरोनामुळे बेरोजगारीचे संकट आणखी वाढले आहे. शेतीसह दुधव्यवसाय फारसा परवड नसल्याने शेती करण्यापेक्षा चांगली नोकरी शोधत आहे. सरकारने तातडीने मोठी पोलिस भरती काढावी. त्यासाठी शेकडो तरुण नियमित मैदानी सरावासह लेखीची तयारी करीत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New experiments in agriculture by youth from Mumbai and Pune