दोन वर्षापासून गुंगारा देण्याऱ्या संशयित आरोपीला त्यागी यांच्या पथकाकडून अटक

सुनील गर्जे
Wednesday, 4 November 2020

दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीच्या  त्याच्या राहत्या घरातच मुसक्या आवळण्यात नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी व त्यांच्या पोलिस पथकाला यश आले आहे.

नेवासे (अहमदनगर) : दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीच्या  त्याच्या राहत्या घरातच मुसक्या आवळण्यात नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी व त्यांच्या पोलिस पथकाला यश आले आहे. त्यागी यांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार मोहीम उघडल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. 

मोहसीन बादशहा सय्यद (रा. माळी चिंचोरे, ता. नेवासे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांच्याविरोधात जुलै २०१८ मध्ये नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखलपासून बादशहा पोलिसांना गुंगारा देत होता.

दरम्यान नेवासे पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून प्रभारी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांनी आपल्या पोलिस पथकासह संशयित आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. दरम्यान आरोपीला नेवासे पोलिसांत हजर करून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे नेवासे पोलिसांनी सांगितले. 

मटका चालकावर पहिलाच गुन्हा
नेवासे पोलिसांनी पोलिस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या पथकाने नेवासे परिसरातील संभाजीनगरात सोमवारी (ता. २) सायंकाळी मटका अड्ड्यावर छापा टाकून अंकुश परसराम धनवटे याला रोख रकमेसह ताब्यात घेऊन धनवटेसह मटका चालक लक्ष्मण किसन भवार (रा. प्रवरासंगम, ता. नेवासे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनेक वर्षांनंतर मुख्य मटका बुकीवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान अवैध वाळू वाहातुकीविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

नेवासे शहरासह तालुक्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायाबाबत नागरिकांनी मला किंवा पोलिसांशी संपर्क साधावा किंवा माहिती द्यावी. तालुक्यात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही.
- अभिनव त्यागी, प्रभारी पोलीस अधिकारी, नेवासे
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newas police arrested the suspect who had been shouting for two years