निघोज ग्रामपंचायतीत महिलाच करणार प्रस्तापितांविरोधात पॅनल

अनिल चौधरी
Thursday, 10 December 2020

या महिलांनी आता या गावपुढार्यांना अद्दल घडविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महीलांचा स्वतंत्र पॅनल उभा करुन पुन्हा एकदा महीलांची ताकद दाखविण्यासाठी या महीला सरसावल्या आहेत.

निघोज - ऐतिहासिक निर्णय होवुन महीलांच्या पुढाकारातुन दारूबंदी झालेल्या निघोज गावात अवघ्या काही वर्षातच गावपुढार्यांनी ही दारुबंदी उठवल्याने गेल्या अनेक दिवसापासून संतप्त असलेल्या दारुबंदी चळवळीच्या महीलांनी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. होऊ घातलेल्या  ग्रामपंचायत निवडणुकीत दारूबंदी चळवळीतील महिलांचा स्वतंत्र पॅनल उभा करून गावातील नेतेमंडळी व गावपुढार्यांना अद्दल घडविण्यात येणार असल्याने यंदाची ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

पारनेर तालुक्यात बहुतांशी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असुन यामध्ये तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी निघोज ग्रामपंचायतीची निवडणुक होत असल्याने सध्या अनेक जण गुडघ्याला बाशिंग बाधुन तयार आहेत. वाँर्ड रचना करण्यात आली असली तरी अनेक गावपुढार्यांनी मनाप्रमाणे वार्डरचना झाली नसल्याने तक्रारीही केल्या आहेत.

निवडणुकीचे पडघम गावात वाजु लागल्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होण्याअगोदरच अनेकजण भावी सरपंच म्हणुन स्वत:ला मिरवत असताना गावातील दारुबंदीच्या महिला अचानक आक्रमक झाल्याने या भावी सरपंचाची डोकेदुखी वाढली आहे.

अॉगष्ट 2016मध्ये गावातील महीलांनी एकत्र येऊन गावात दारुबंदीचा लढा जिंकला. निघोजच्या या महिलांचे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातुन कौतुक झाले.मोठ्या गावामध्येही दारुबंदी होवु शकते हे येथील महीलांनी दाखवुन दिले होते. मात्र अवघ्या तीन वर्षात गावपुढार्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव देवुन ही दारुबंदी उठवल्याने गावातील अनेक महीला नाराज झाल्या.

या महिलांनी आता या गावपुढार्यांना अद्दल घडविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांचा स्वतंत्र पॅनल उभा करुन पुन्हा एकदा महीलांची ताकद दाखविण्यासाठी या महीला सरसावल्या आहेत. त्यामुळे गावातील पुढारी व महीलांमधील संघर्ष या निवडणुकीत होणार असल्याने निघोज ग्रामपंचायतची निवडणुक यंदाही जिल्ह्यात गाजण्याची चिन्हे आहेत.

 

महिलांनी एकजुट करुन गावात दारुबंदी केली असताना गावातील पुढार्यांनी ठराव करुन दारुबंदी उठवुन गावातील अनेक महीलांचा एकप्रकारे अपमान केला आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
- कांता लंके,दारुबंदी चळवळ कार्यकर्त्या, निघोज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Nighoj gram panchayat, only women will form a panel against the proposed