नगर : निर्मलनगर व बोल्हेगाव परिसरात पाणी साचले. पावसाच्या पाण्याने घरांत प्रवेश केला. लोकांचे संसार पाण्यात भिजले. निर्मलनगरमध्ये पावसाने केलेल्या नुकसानीने माजी नगरसेवक निखिल वारे वैतागले. निर्मलनगरमधील नुकसान दाखविण्यासाठी निखिल वारे यांनी महापालिका आयुक्त मायकलवार यांना चक्क दुचाकीवर बसवून सावेडी उपनगराची सफर घडविली. रस्त्यांवरील खड्ड्यांत साचलेल्या उबक्यातून दुचाकी जाताच आयुक्तांना वारेंनी निर्मलनगर परिसरातील नागरी समस्यांचा पाढाच सांगितला तसेच निर्मलनगरच्या दूरवस्थेचे दर्शनही घडविले. यावेळी वारे यांनी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
शहरात पहिल्याच पावसात विविध भागांत नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. महापालिकेच्या चुकीच्या कारभारामुळे शहरातील ओढे-नाले गायब झाले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाट दिसेल त्या दिशेने जाते व नागरिकांच्या घरात शिरते. शहरातील ओढे-नाले खुले करा; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल. आयुक्तांनी शहरातील गायब झालेले ओढे-नाले दाखवावेत, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे आज केली.
सावेडी उपनगरांत जागोजागी पाणी साचल्याने संपत बारस्कर व सावेडी उपनगरातील नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना घेराव घातला. निर्मलनगर गावडे मळा परिसरातील ओढ्या-नाल्याचे अस्तित्व गायब झाल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये गेले, असा आरोप या वेळी करण्यात आला. बारस्कर, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, विनित पाऊलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, शहर अभियंता सुरेश इथापे, नगररचनाकार राम चारठाणकर, अभियंता वैभव जोशी आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सावेडी उपनगराची पाहणी केली.
आयुक्त म्हणाले, ""हा प्रश्न लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी लवकर पाहणी करून प्रस्ताव तयार करावा.'' शहरातील ओढे-नाले खुले करावेत, असे आदेश या वेळी त्यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.