Breaking : इंदोरीकर महाराजांना दिलासा; जिल्हा सत्र न्यायालयात 20 ऑगस्टला पुढील सुनावणी

आनंद गायकवाड
Friday, 7 August 2020

अपत्यप्राप्तीच्या संदर्भात कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर) अडचणीत सापडले होते.

संगमनेर (अहमदनगर) : अपत्यप्राप्तीच्या संदर्भात कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर) अडचणीत सापडले होते.

त्यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. त्यांच्या विरोधातील आज असलेल्या सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केल्याने स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी गुरुवारी (20 ऑगस्ट) होणार असल्य़ाची माहिती त्यांचे वकिल के. डी. धुमाळ यांनी दिली.

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशुभ वेळेला झाला तर औलाद रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळविणारी होत असल्याचे विधान इंदोरीकर महाराज यांनी केले होते. या विधानाचे व्हीडीओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.

त्यानुसार 3 जुलै रोजी संगमनेरचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. यावेळी सरकारी वकील अ‍ॅड. लिना चव्हाण यांनी सरकारची बाजू मांडली होती. तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. आजच्या आदेशाने 20 ऑगस्टपर्य़ंत इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nivrutti Deshmukh case to be heard in District Sessions Court on August 20