esakal | महाराष्ट्रात भाजपचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही; महाविकास आघाडी पुढील चार वर्ष राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

No BJP operation in Maharashtra will be successful

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे.

महाराष्ट्रात भाजपचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही; महाविकास आघाडी पुढील चार वर्ष राहणार

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेली कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत आहे. भाजपविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा राजकीय कारणांसाठी वापर करून विरोधकांना धमकाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही, असा आरोप महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. 

पत्रकात मंत्री थोरात यांनी म्हटले आहे, की कोरोनामुळे महसुल घटला. अशा वेळी केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात देणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा वेळी केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीने 10 हजार कोटींचे पॅकेज दिले. परंतु, केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठीही केंद्राचे पथक आले नाही. केंद्राची भूमिका राज्याला सापत्न वागणूक देणारी आहे. 

वीजबिलात सवलत मिळावी, ही कॉंग्रेसचीही भावना आहे; परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करीत आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी असताना, देशात पेट्रोल, डिझेल महाग विकून केंद्र सरकार जनतेची लूट करीत आहे. वीजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी या लुटमारीविरोधातही आंदोलन करावे, असा टोला त्यांनी लगावला. 

कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही 
महाविकास आघाडीचे सरकार पडेल, असे दिवास्वप्न भाजप नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पाहावीत, असा टोला थोरात यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला. मी पुन्हा येणार, म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पाहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून, पुढील चार वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करणार आहोत, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image