
अनेकांना मास्क नव्हते. तर, अनेकांनी खिशातील रूमाल नाकाला लावून वेळ निभावून नेली. दुसरीकडे प्रशिक्षण वर्गास 112 अधिकारी- कर्माचाऱ्यांनी दांडी मारली.
पारनेर : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या 776 जागांसाठी सुमारे अडीच हजारांवर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांसाठी नुकताच प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडला. तर, त्याला प्रशिक्षणाला 112 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. आता, दांडी बहाद्दरांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून 24 तासात खुलासा न दिल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
तालुक्यात 114 ग्रामपंचायतीपैकी 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग नेमला आहे. त्या अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी नुकताच प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. तिथे कोणीही सोशल डिस्टंन्सचा नियम पाळला नाही.
अनेकांना मास्क नव्हते. तर, अनेकांनी खिशातील रूमाल नाकाला लावून वेळ निभावून नेली. दुसरीकडे प्रशिक्षण वर्गास 112 अधिकारी- कर्माचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी संबंधित दांडी बहाद्दरांना नियमानुसार कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत.
समाधानकारक खुलासा न दिल्यास कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे दांडी बहाद्दरांची गाळण उडाली आहे.
दांडीबहाद्दरही नाराज
दांडी बहाद्दरांनी नोटिशीबाबत नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वेळी निवडणुकीच्या कामकाजासाठी आमची नियुक्ती केली जाते. कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी कधीच नियुक्ती दिली जात नाही. त्यांची नावे सोईस्कररित्या वगळली जातात. प्रथम त्याची कारणे शोधावीत आणि आमच्यावर कारवाई करावी, असा सूर दांडी बहाद्दरांनी आवळल्याचे समजते.