
संगमनेरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी सकाळी संगमनेर नाशिक मार्गे मुंबई सेंट्रल ही दुसरी बससेवा मंगळवारपासून सुरु होत.
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेरच्या मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी सकाळी संगमनेर नाशिक मार्गे मुंबई सेंट्रल ही दुसरी बससेवा मंगळवारपासून सुरु होत असल्याची माहिती संगमनेर आगार व्यवस्थापक बाबासाहेब शिंदे यांनी दिली.
संगमनेर या मध्यवर्ती ठिकाणापासून मुंबईकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. तालुक्यातील हंगेवाडी, शिबलापूर, शेडगाव, मालुंजे, पानोडी, पिंप्रीलौकी अजमपूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रूक, प्रतापपूर, खळी आदी गावातील लोक नोकरी व कामधंद्याच्या निमित्ताने मुंबई, ठाणे, कल्याण, वाशी आदी ठिकाणी कायम प्रवास करतात. त्यांच्या सोईची असलेली बससेवा कोवीड प्रादुर्भावाच्या काळात गेल्या आठ महिन्यांपासून खंडीत झाली होती. त्यामुळे मिळेल त्या खासगी वाहनातून अवाजवी भाडे देवून, जोखमीचा प्रवास करावा लागत होता.
संगमनेर आगारातून नाशिकमार्गे मुंबईला जाण्यासाठी बस सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटणारी पहिली बस 252.8 किलोमिटरचे अंतर कापून दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईला पोचणार आहे. तर रात्री नऊ वाजता सुटणारी बस मुंबईला पहाटे साडेतार वाजता पोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासासाठी सकाळी सव्वासातला सुटणारी बस संगमनेरला दुपारी अडीच वाजता तसेच रात्री 10 वाजता सुटणारी बस पहाटे पाच वाजता पोचणार आहे. या लांब पल्ल्यासाठी स्वच्छ व सुस्थितीतील बस उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आगाराला देण्यात आल्या आहेत. मुंबईला जाण्या येण्यासाठी बस वाढल्याने प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
संपादन : अशोक मुरुमकर