कोरोनामुळे हाताला मिळेना काम.. भाजीविक्रेत्यांची भाऊगर्दी

गौरव साळुंके
गुरुवार, 2 जुलै 2020

कोरोनाच्या कहरात शेतमालावर मध्यस्थ व किरकोळ विक्रेते पैसे कमवित आहेत. पालिकेकडे 160 भाजीविक्रेत्यांची अधिकृत नोंदणी असली, तरी शहरात 500 हून अधिक विक्रेते हा व्यवसाय करीत असल्याचे दिसते.

श्रीरामपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील किरकोळ भाजीविक्रेत्यांची संख्या वाढली. सध्या बाजार समितीच्या आवारात पहाटेच व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी करतात व वाढीव दराने त्याची शहरात विक्री करतात. त्यामुळे तालुक्‍यातील भाजीपाला उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. 

कोरोनाच्या कहरात शेतमालावर मध्यस्थ व किरकोळ विक्रेते पैसे कमवित आहेत. पालिकेकडे 160 भाजीविक्रेत्यांची अधिकृत नोंदणी असली, तरी शहरात 500 हून अधिक विक्रेते हा व्यवसाय करीत असल्याचे दिसते. पालिकेने नियम-अटी घालून भाजीविक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर काही शेतकरी व व्यापारी शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला बसून भाजीविक्री करीत आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला काम राहिले नाही. 

हेही वाचा : नगरमध्ये 21 जणांची कोरोनावर मात 

भाजीविक्रीतून चांगले पैसे मिळत असल्याने, किरकोळ व्यापारीही भाजीविक्रीकडे वळले आहेत. किरकोळ विक्रेत्यांची गर्दी वाढल्याने, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाच्या धास्तीने शेतकऱ्यांनी नाईलाजाने भाजीपाला ठोक विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

ग्राहकांनाही आर्थिक भुर्दंड 

पावसाळ्यात शेतीकामात शेतकरी व्यस्त असतो. रस्त्यावर बसून भाजीविक्री करणे, त्याच्यासाठी अवघड असते. त्यामुळे कमी दरात ठोक विक्री करुन तो तोटा सहन करतो. शहरातील किरकोळ विक्रेते रस्त्याच्या कडेला बसून हाच माल दुप्पट दराने विकतात. दुसरीकडे ग्राहकांनाही जादा पैसे मोजावे लागतात. शेतकरी व ग्राहक तोट्यात, तर दोघांमधील मध्यस्त किरकोळ विक्रेता मात्र नफ्यात, असे चित्र आहे. ठोक विक्री करून शेतकरी गावी परततो. शेतीकामात गुंततो. मध्यस्थ व किरकोळ विक्रेते ग्राहकांना दुप्पट दराने विक्री करुन काही तासांत नफा कमावतात. 

विक्री करावी, की शेतीकाम 

भाजीपाला ठोक विक्रीच्या तुलनेत किरकोळ खरेदीत सरासरी 50 टक्के दराची तफावत असते. शेतकऱ्यांकडे थेट विक्रीचे कौशल्य नसल्याने, नाईलाजाने ते ठोक विक्रीचा मार्ग पत्करतात. बाजारात बसून भाजीपाला विक्री करावी का, शेतीकाम करावे, अशी त्यांची द्विधा मनस्थिती असते. शहरात 500 किरकोळ विक्रेत्यांमार्फत ग्राहकांना भाजीपाल्याची विक्री होते. त्यांची रोजची साखळी असते. त्यामुळे फक्त 5 टक्के शेतकरी थेट भाजीपाला विकतात, तर 95 टक्के शेतकरी ठोक विक्री करुन तोटा सहन करतात. 
-  नितीन गवारे, भाजीउत्पादक शेतकरी, शिरसगाव, श्रीरामपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of vegetable sellers increased due to lack of work