
स्वयंभू शनिमूर्तीच्या ववसा पूजनासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सोनई (अहमदनगर) : मकर संक्रांतनिमित्त शनिशिंगणापुर येथे शनिदर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांना तिळगुळ व वाण वाटप करण्यात आले. स्वयंभू शनिमूर्तीच्या ववसा पूजनासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
संक्रांत सणानिमित्त सकाळपासूनच महिलांनी मंदिरात गर्दी केली होती. महिला विश्वस्त सुनिता विठ्ठल आढाव व अध्यक्ष भागवत बानकर यांच्या पत्नी ज्योती बानकर यांनी स्वयंभू शनिमूर्तीचे चौथ-या खालून ववसा (संक्रांत पूजन) केले. यावेळी ग्रामस्थ महिला मनिषा बानकर, वर्षा बानकर उपस्थित होत्या. महिलांनी शनिदेवाला सुगड्यातील ववसा वाहून दर्शन घेतले.
देवस्थानच्या वतीने भाविकांना तिळगुळ वाटप करण्यात आले. महिला भाविक गायत्री मराठे, अश्विनी मराठे, नंदिनी मराठे, सुशिला मराठे राहणार जळगाव यांना वाण म्हणून शनिमहात्म पुस्तक देण्यात आले. उदासी महाराज मठ, समाधीस्थळ, शिवमंदीर, लक्ष्मी मंदीर येथेही दुपारपर्यंत दर्शनासाठी गर्दी होती.