सरकारकडे पैसेच नाही, नुकसानीचे पंचनामे कशाला करता?

गौरव साळुंके
Tuesday, 20 October 2020

मागील वर्षाच्या नुकसानभरपाईच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदान देताना अन्याय झाला आहे.

श्रीरामपूर ः पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना, येथील स्थानिक प्रशासन ढिम्म आहे. "सरकारकडे पैसे नसल्याने यंदा नुकसानभरपाई मिळणार नाही; मग पंचनामे कशासाठी करायचे' असे सांगून काही अधिकारी व नेतेमंडळीही पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. किमान नुकसानीच्या परिस्थितीचा आढावा नोंदविण्यासाठी तरी पंचनामे करणे आवश्‍यक आहे. मात्र, तालुक्‍यात प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. 

मागील वर्षाच्या नुकसानभरपाईच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यातील शेतकऱ्यांना शासकीय अनुदान देताना अन्याय झाला आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे तालुक्‍यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बाधित पिकांचे पंचनामे करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

राज्यात यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाला. आता तरी पाऊस थांबेल, असे वाटत असताना, दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. अतिपावसामुळे यंदा तालुक्‍यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले. शेतात पाणी साचल्याने सोयाबीन काळे पडले. अनेक शिवारात पिकांना मोड आले. कापसाचेही मोठे नुकसान झाले. भूईमूगला यंदा शेंगाच लागल्या नसल्याने उत्पादनात मोठी घट झाली.

प्रशासनाच्या सुचनेनुसार कृषी विभागाने जिल्ह्यासह राज्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रारंभ केला. मात्र, तालुक्‍यातील काही अधिकारी आणि नेतेमंडळी पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

राजेंद्र भांड, सुरेश ताके, जितेंद्र भोसले, रामकृष्ण आसने, दत्तात्रेय लिप्टे, ईश्वर दरंदले, महेश लवांडे, अतुल खरात, राजेंद्र थोरे आदींनी ही मागणी केली आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officials refrain from conducting crop panchnama