साईबाबांच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पासची गरज नाही; मिळणार ऑफलाईन पास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saibaba

साईबाबांच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पासची गरज नाही

शिर्डी (जि. अहमदनगर) : साईसंस्थानच्या वारंवार बंद पडणाऱ्या वेबसाईटमुळे ऑनलाईन दर्शन पास मिळविताना भाविकांना होणारा मनस्ताप उद्यापासून बंद होईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दररोज दहा हजार भाविकांना ऑफ लाईन दर्शन पास देण्यास परवानगी दिली आहे. तथापि बाहेर गावांहून येणाऱ्या भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास घेऊन शिर्डीत यावे, असे आवाहन साईसंस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रसादालयाबाबत अद्याप निर्णय नाही

ऑफलाईन दर्शन व्यवस्था सुरू होणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळेल. मात्र प्रसादालय सुरू करण्याबाबत आज सायंकाळपर्यंत कुठलाही निर्णय झाला नव्हता. प्रसादालय सुरू केल्यास भाविकांची गैरसोय दूर होईल. गर्दीच्या काळात खाद्यपदार्थांचे दर काही ठिकाणी दुपटीने वाढतात. उपाहारगृहांसमोर रांगा लावाव्या लागतात. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी मंदिर खुले झाले त्यावेळी प्रसादालय सुरू करण्याचे नियोजन जाहीर केले होते. मात्र कोविडमुळे त्यास परवानगी मिळालेली नाही.

हेही वाचा: अहमदनगर : सुवर्णव्यावसायिकास मागीतली दोन कोटींची खंडणी

दररोज 15 हजार ऑनलाईन, तर १० हजार ऑफलाईन दर्शन पास

चाळीस दिवसांपूर्वी साईमंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यावेळीत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन दर्शन पास व्यवस्थेचे नियोजन केले होते. तसेच प्रसादालय सुरू करण्याचेही नियोजन केले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून ऑफलाईन दर्शन व्यवस्था व प्रसादालय सुरू करण्यास परवानगी दिली नाही.

ऑनलाईन दर्शन व्यवस्था सुरळीत चालेना आणि ऑफलाईन दर्शन व्यवस्था बंद त्यामुळे गेल्या चाळीस दिवसांपासून भाविक हैराण झाले होते. गर्दीच्या काळात ऑनलाईन दर्शन पासचा राजरोस काळाबाजार सुरू झाला होता. काल भाविकांच्या खात्यातील पैसे वारंवार कपात झाले. मात्र दर्शन पास मिळाले नाहीत. त्यांच्या सहनशिलतेचा अंत झाला. संतप्त भाविकांनी दर्शनबारी बाहेर ठिय्या आंदोलन केले. पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. मुख्य कार्यकारी अधिकारी बाणाईत यांनी केलेले नियोजन कायम ठेवले असते, तर भाविकांची परवड थांबली असती.

हेही वाचा: एसटीच्या दारी खासगीची सवारी; प्रवाशांची खासगी वाहनचालकांकडून लूट

दरम्यान, साईसंस्थानने ऑफ लाईन दर्शन व्यवस्थेची पूर्वतयारी आज सायंकाळपासून सुरू केली. उद्या दुपारच्या आरतीनंतर ही व्यवस्था सुरू होईल व त्यानंतर ऑनलाईन व्यवस्थेप्रमाणेच ऑफलाईन पास व्यवस्था सुरळीत सुरू होईल. दररोज पंधरा हजार ऑनलाईन, तर दहा हजार ऑफलाईन दर्शन पास दिले जातील. त्यामुळे नित्याच्या दर्शनार्थी भाविकांची संख्या पंचवीस हजारांपर्यंत जाईल.

loading image
go to top