गुटखा घेऊन सुसाट सुटला अन 'विनामास्क'मुळे पोलिसांत गुंतला

सुनील गर्जे
Monday, 30 November 2020

एकतर जवळ बंदी असलेला खर्रा मावा (गुटखा) त्यात तोंडाला मास्क नाही, वरून  दुचाकीवर सुसाट निघालेला..

नेवासे (अहमदनगर) : एकतर जवळ बंदी असलेला खर्रा मावा (गुटखा) त्यात तोंडाला मास्क नाही, वरून  दुचाकीवर सुसाट निघालेला.. तेही विनामास्क विरोधात कारवाई करत असलेल्या पोलिसांच्या समोरून. पोलिसांनी त्याला अडवले 'विनामास्क' म्हणून आणि तो अडकला 'खर्रा मावा' प्रकरणात!  

नेवासे पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याकुब नवाब शहा (वय 28, रा. गंगापुर ता. गंगापुर जि. औरगांबाद) असे गुटखा प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

नेवासे- शेवगाव रस्त्यावर रविवार (ता. २९) कुकाणे (ता. नेवासे) येथे पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण ठोंबरे, भिमराज पवार, पोलिस नाईक किशोर काळे, दिलीप राठोड, वाहातुक पोलिस कर्मचारी अमोल बुचकुल, पोलिस कॉन्स्टेबल गणेश गलधर, आंबादास गीते, अशोक कुदळे, नितीन भाताने हे विनामास्क विरोधात ठिकठिकाणी थांबून कारवाई करत होते.

त्यावेळी आरोपी याकुब नवाब शहा हा दुचाकीवर सुसाट वेगाने शेवगावच्या दिशेने 'विनामास्क' जात असतांना त्याला फिर्यादी वाहातुक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल अमोल बुचकुल यांनी त्याला अडवले,  दंडात्मक कारवाई करत असतांनाच  त्याला दुचाकीला मागे ठेवलेल्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता तो सांगतांना गोंधळला.

त्यामुळे पोलिसांना  संशय आला म्हणून झडती घेतली असता पोलिसांनी त्याच्याकडून वीस किलो बंदी अलेला सुगंधी तंबाखू व सुपारीसह तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक केली. याप्रकरणी आरोपी याकूब शहा यांच्याविरोधात  नेवासे पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested by police in Nevasa taluka