करमाळ्यातील एकाला पिस्तूलासह कर्जतमध्ये पकडले

निलेश दिवटे
Friday, 1 January 2021

पोरे रस्त्यावर मोटारीतून पिस्तूलासह फिरताना पोलिसांच्या गस्तीपथकाने एकास ताब्यात घेतले. पांडुरंग ऊर्फ पप्पू सतीश कवडे (वय 24, रा. कात्रज, ता. करमाळा) असे त्याचे नाव आहे.

कर्जत (अहमदनगर) : तालुक्‍यातील शिंपोरे रस्त्यावर मोटारीतून पिस्तूलासह फिरताना पोलिसांच्या गस्तीपथकाने एकास ताब्यात घेतले. पांडुरंग ऊर्फ पप्पू सतीश कवडे (वय 24, रा. कात्रज, ता. करमाळा) असे त्याचे नाव आहे. 

पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल, फावड्याचा प्लॅस्टिकचा दांडा, वायररोप, 400 रुपये व मोटार, असा एकूण 5 लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, पप्पू नावाची व्यक्ती शिंपोरे येथे वाळूची डील करण्यासाठी येत असून, त्याच्याजवळ पिस्तूल असल्याचे समजले. पथकाने शिंपोरे रस्त्यावर सापळा रचून संशयावरून मोटार (एमएच 42 एएस 3182) अडविली. चालक कवडे याच्याकडे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी त्यास अटक करून, वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला. 

याबाबत पोलिस अंमलदार श्‍याम जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपीविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात वाळूचोरीचे 2 गुन्हे दाखल आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One of the carjackers was caught in Karjat with a pistol