कुकण्यात कोरोनाचा शिरकाव; पहिलाच पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

सुनील गर्जे
Saturday, 25 July 2020

कुकाणे येथे ८५ वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील कुकाणे येथे ८५ वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित सूर्यवंशी यांनी दिली. या भागात हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने कुकाणे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या परिवारातील सर्व सदस्यांना कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. नेवासे तालुक्यात नेवासे शहर, बुद्रुक, सोनई, घोडेगाव, सलाबतपुर, शिरसगाव, जळके या भागानंतर आता कुकाणे भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने संपूर्ण नेवासे तालुक्यालाच  आता कोरोनाच्या विळखा घातला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

कुकाणे येथील या वृद्ध व्यक्तीला श्वासोच्छ्वासचा त्रास होत असल्याने त्यांना नेवासे फाटा येथील कोरोना विलगिक कक्षात दोन दिवसांपूर्वी घशातील स्राव नमुने घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना कुकाणे येथे घरीच होम  क्वारंटाइन केले होते.  त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

कुकाणे येथील पॉझिटिव्ह रुग्णाला पुढील उपचारासाठी  नेवासे फाटा येथील विलगिकरण कक्षात दाखल करणार आहे. दरम्यान त्याच्या परिवारातील  सर्व सदस्यांचे  स्राव नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी व  कुकाणेचे आरोग्य अधिकारी डॉ. रामेश्वर शिंदे यांनी दिली. 
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One corona positive at Kukane in Nevasa taluka