संगमनेर महाविद्यालयात बहुपर्यायी प्रश्नपत्रिका निर्मितीवर एकदिवसीय कार्यशाळा

आनंद गायकवाड
Sunday, 11 October 2020

संगमनेर महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत परामर्श योजनेंतर्गत, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेत करण्यात आले.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत परामर्श योजनेंतर्गत, बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे मार्गदर्शन ऑनलाईन कार्यशाळेत करण्यात आले. संसाधन व्यक्ती म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सुरेश पाटील याप्रसंगी उपस्थित होते. 

युजीसी पुरस्कृत परामर्श योजनेंतर्गत महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे दोन सत्रात या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. यावेळी श्रमिक ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. आर. एम. ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ उपस्थित होते. 

परीक्षा विभागातील प्रदीर्घ अनुभवाच्या आधारे बहुपर्यायी प्रश्नपत्रिका तयार करतांना अभ्यासक्रम आणि निर्धारित गुण यांचा समतोल कसा साधावा, प्रश्नांची काठिण्यपातळी व भाषा कशी असावी तसेच कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्यात याचे प्रात्यक्षिकाद्वारे सखोल मार्गदर्शन प्रा. पाटील त्यांनी केले. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी या अंतर्गत महाविद्यालयाने राबविलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच कोरोना काळात परीक्षा पद्धतीतही मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असल्याने प्राध्यापकांनी या बदलांसाठी तयार असावे, ऑनलाइन शिक्षणाच्या काळात तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या नवनवीन गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या पाहिजे असे मत व्यक्त केले.

प्रास्ताविक पदार्थविज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजयकुमार दळवी यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. दिगंबर घोडके यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. आर. बी. ताशिलदार यांनी मानले. या कार्यक्रमाचे नियोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी केले. कार्यशाळेत परामर्श योजनेतील साकुर, अकोले, पुणे तसेच संगमनेर वरिष्ठ महाविद्यालय व श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 300 हून अधिक प्राध्यापकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One day workshop on multiple choice question paper production at Sangamner College