कालव्याच्या कामात ठेकेदाराचे दुर्लक्ष; खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू

शांताराम काळे
Sunday, 26 July 2020

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम म्हाळादेवी शिवारात सुरू आहे. ठेकेदाराने हे काम सुरू असताना दक्षता न घेतल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा आशयाचे तक्रारीचे निवेदन ग्रामस्थांनी अकोले पोलिस निरीक्षकांना दिले आहे.

अकोले (अहमदनगर) : निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम म्हाळादेवी शिवारात सुरू आहे. ठेकेदाराने हे काम सुरू असताना दक्षता न घेतल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशा आशयाचे तक्रारीचे निवेदन ग्रामस्थांनी अकोले पोलिस निरीक्षकांना दिले आहे.

त्यामुळे या प्रकरणाने ठेकेदार विरुद्ध गाव अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठेकेदाराने यापुढे दक्षता न घेतल्यास व मयताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई न दिल्यास त्याविरुद्ध आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे कामकाज म्हाळादेवी येथील जंगल वहिवाटीत सुरू आहे. या कामकाजाच्या बाजूलाच खोलखड्डे आहेत. मात्र तेथे कोणत्याही प्रकारची सूचना फलक किंवा बॅरिकेट्स न लावल्याने चंद्रभान परशराम हासे (वय 61) याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला, असे ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

निळवंडे धरणाच्या जलसेतुचे काम व डाव्या कालव्याचे काम सुरू आहे. यानिमित्ताने खोदाई केलेला खोल खड्डा व आजूबाजूला कोणत्याही प्रकारची दक्षता न घेतल्याने हा प्रकार घडला आहे, अशा प्रकारचा आरोप या गावातील ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदाराने काम सुरु असताना कोणत्याही प्रकारची दक्षता घेतलेली नाही, असे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे, ग्रामस्थ अशोक संगारे, भानुदास हासे, प्रकाश हासे, कैलास मुंडे, रामनाथ उघडे आदींनी म्हटले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies while work on Nilwande dam canal is underway in Akole taluka