तीन वाहनांच्या धडकेत एक ठार, तीन जखमी

केशव चेमटे
Saturday, 5 December 2020

बेल्हा पाडळी येथील शेतकरी ऊसाने भरलेला ट्रॅक्‍टर भाळवणीच्या दिशेने येत होता. खडीने भरलेला डंपर पाठीमागून भाळवणीकडे येत होता.

भाळवणी : कल्याण - विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर भाळवणी येथे गोरेगाव चौकात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक जण ठार तर दोघे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. 

सुदाम डेरे (वय 38 रा.पाडळी आळे, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, संतोष नाथा डेरे व किसन लक्ष्मण डेरे जखमी जखमी झाले. अधिक माहिती अशी, की खडी वाहतूक करणारा डंपर, उसाने भरलेला ट्रॅक्‍टर व पीकअप अशा तीन वाहनांचा शुक्रवारी (ता. 4) रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास येथील गोरेगाव फाट्याजवळ विचित्र अपघात झाला. त्यात ट्रॅक्‍टरमधील एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले.

बेल्हा पाडळी येथील शेतकरी ऊसाने भरलेला ट्रॅक्‍टर भाळवणीच्या दिशेने येत होता. खडीने भरलेला डंपर पाठीमागून भाळवणीकडे येत होता. तर, पिकअप टेम्पो कल्याणच्या दिशेने जात होता.

यावेळी डंपर समोर चाललेला ऊसाचा ट्रॅक्‍टर चालकाच्या लक्षात न घेता आल्याने जोराची धडक होऊन ट्रॅक्‍टरचे ट्रॉलीसह चार तुकडे होऊन साइडच्या गटारात जाऊन पडले तर डंपरविरुद्ध दिशेने रोडच्या बाजूला पलटी झाला तर या वाहनांमध्ये पिकअप आल्याने पिकअपची चालकाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे चिरली गेली. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed, three injured in three-vehicle collision