
लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचा मागील दरवाजा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एक लाख 64 हजारांचा ऐवज पळविला.
शेवगाव (अहमदनगर) : घरातील सर्वजण लग्नासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचा मागील दरवाजा तोडून कपाटातील दागिने व रोख रक्कम असा एक लाख 64 हजारांचा ऐवज पळविला. ही घटना शनिवार (ता. 19) सकाळी 11 ते सायंकाळी चारच्या सुमारास डोंगर आखेगाव (ता. शेवगाव) येथे घडली.
एकनाथ भानुदास डोंगरे (रा. डोंगर आखेगाव ता. शेवगाव) यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, शनिवार (ता. 19) रोजी घरातील व शेजारील सर्व जण गेवराई (ता. नेवासे) येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते.
या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सकाळी 11 ते सायंकाळी चारच्या दरम्यान घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून कपाटाची उचकापाचक केली. एक लाख 29 हजारांचे नेकलेस, झुंबर व वेल तसेच 35 हजारांची रोख रक्कम असा एक लाख 64 हजारांचा ऐवज चोरून नेला. आज रविवारी (ता. 20) उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
संपादन : अशोक मुरुमकर