
नगर जिल्ह्यात 23, तर नाशिक जिल्ह्यात नऊ साखर कारखाने आहेत. त्यांतील 13 कारखाने खासगी आहेत. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने नगरमध्ये 21 कारखाने सुरू आहेत.
नगर ः नाशिक विभागातील 32पैकी 25 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यात नगरमधील 21, तर नाशिकमधील चार कारखान्यांचा समावेश आहे. त्यातून रोज साधारण एक लाख 10 हजार टन गाळप होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 लाख, तर विभागात 31 लाख टन उसाचे गाळप झाले असून, 25 लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे.
नगर जिल्ह्यात 23, तर नाशिक जिल्ह्यात नऊ साखर कारखाने आहेत. त्यांतील 13 कारखाने खासगी आहेत. यंदा उसाचे क्षेत्र अधिक असल्याने नगरमध्ये 21 कारखाने सुरू आहेत. दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम अजून सुरू झाले नाहीत. जिल्ह्यात रोज 90 हजार, तर विभागात एक लाख 10 हजार टन उसाचे गाळप होते. तब्बल 18 कारखान्यांत क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप सुरू आहे.
नगर जिल्ह्यात 29 लाख टन ऊसगाळप झाले असून, त्यात 25 लाख क्विंटलपेक्षा अधिक साखरउत्पादन झाले आहे. विभागात 31 लाख टनांपेक्षा अधिक ऊसगाळप झाले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक गाळप मुळा, भाऊसाहेब थोरात, वृद्धेश्वर, गंगामाई, अंबालिका कारखान्यांचे आहे. गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात सरासरी 10.20 टक्के साखरउतारा निघाला होता. यंदा तो त्या तुलनेत कमीच आहे. आतापर्यंत सरासरी 8.01 साखरउतारा निघाला आहे. विभागाचा सरासरी साखरउतारा 8 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम अहवालानुसार साखरउतारा सरासरी 10.42 होता.
यंदा उसाचे दुप्पट गाळप होणार
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी 56 लाख 66 हजार टन उसाचे गाळप केले होते. त्या तुलनेत यंदा दुप्पट गाळप होण्याचा अंदाज आहे. विभागात एक कोटी टन ऊस उपलब्ध आहे. अन्य भागातून 20 लाख टन ऊस विभागात येण्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून वर्तविण्यात आला. साधारणपणे सहा महिने गाळप चालण्याचा अंदाज आहे.
संपादन - अशोक निंबाळकर