तालुका हिरवागार करण्यासाठी ते लावत आहेत रोज 500 बिया 

मनोज जोशी 
Monday, 27 July 2020

सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे व त्यांचे मित्रमंडळ हे सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवून जनजागृतीचे संदेश देतात.

कोपरगाव (अहमदनगर) : येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे व त्यांचे मित्रमंडळ हे सातत्याने समाजाभिमुख उपक्रम राबवून जनजागृतीचे संदेश देतात.

त्याच पार्श्‍वभूमीवर यंदा त्यांनी तालुक्‍यातील विविध रस्ते, उपरस्त्यांच्याकडेला करंज, हिरडा, भेरडा, कडुलिंब, लक्ष्मीकरू, जांभूळ, वड अशा विविध वृक्षांच्या तब्बल एक लाख बियांची लागवड करून तालुक्‍याला हिरवेगार करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यातून वृक्ष संवर्धनाची जनजागृती केली जात आहे. रोज किमान पाचशे बिया लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम राबवली जाते. मात्र त्यात किती वृक्ष उगवले व किती पाणी मुरले यावर देखील सहा महिन्यापूर्वी काळे यांनी लक्ष वेधले होते. यावर्षी काळेसह मनोहर कृष्णानी, संदीप चव्हाण, अशोक कानडे, कृष्णा कानडे,बाळासाहेब येवले व इतर कार्यकर्ते यांनी स्वतः पावसाळ्यापूर्वी चार महिने तालुक्‍यात बिया लावण्याचा चंग बांधून त्या पद्धतीने कार्य सुरु केले. दररोज ही मंडळी हातात पहार, पीव्हीसी पाईप, खिश्‍यात बिया घेऊन शहर व उपनगरातून पेरणी करत आहेत. पावसाळासंपे पर्यंत एक लाख बिया लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ग्रामीण भागात रस्त्याच्याकडेला पेरणीला सुरुवात करणार असल्याचे काळे यांनी सांगितले. 

सुरुवातीला काही कार्यकर्ते पहारीने छोटे खड्डे घेतात. दुसरा मागून पीव्हीसी पाईपमधून बी पेरतो असे अखंड काम सध्या सुरु आहे. एक लाख बियातून पाच हजार झाडे जरी उगवली व ज्या त्या गावांनी त्यांची निगा राखली तरी परिसर हिरवेगार होईल, असे काळे यांनी सांगितले. 

संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने कडुलिंबची झाडे असून परिसरात खाली पडलेल्या लीम्बोली बिया ट्रस्टचे संचालक संदीप चव्हाण यांनी गोळा करून देऊन पेरणीमध्ये मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh trees to be planted by Sanjay Kale in Kopargaon taluka