esakal | शेतकऱ्यांना होणार फायदा, केसापुरात एक हजार टनांचा कांदा साठवण प्रकल्प

बोलून बातमी शोधा

One thousand ton onion storage project to be set up at Kesapur}

कांदा साठवण प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा, केसापुरात एक हजार टनांचा कांदा साठवण प्रकल्प
sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : केसापूर येथे "नाफेड'अंतर्गत साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे एक हजार टन क्षमतेचा आधुनिक कांदासाठवणूक प्रकल्प उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. एक कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाद्वारे 10 गावांमधील 815 सभासद शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी करीत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. कंपनीचे अध्यक्ष संभाजी नान्नोर, संचालक दादासाहेब मेहत्रे, कुंडलिक खपके, विलास टाकसाळ, रायभान जाधव, शिवाजी कोळसे, वसंत कोळसे, अरुण ढूस, नामदेव मेहत्रे, सुभाष टाकसाळ, धनंजय टाकसाळ, कार्यकारी संचालक सुनील साबळे आदी उपस्थित होते. 

दादासाहेब मेहेत्रे म्हणाले, ""तांभेरे, तांदुळनेर, कोल्हार खुर्द, चिंचोली, गंगापूर, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, दवणगाव, आंबी, केसापूर येथील 815 शेतकरी सभासद आहेत. एक कोटी रुपये खर्चाच्या कांदासाठवणूक प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे 44 लाख रुपये अनुदान मिळाले आहे. तांभेरे येथे कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्रातर्फे शेतकऱ्यांना पिकांची उत्पादनक्षमता वाढविणे, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, शेतमालाची मूल्यवृद्धी व शेतकऱ्यांना सामुदायिक बाजारपेठ मिळवून देणे, याबाबत मदत व मार्गदर्शन केले जात आहे.''