नेप्ती बाजार समितीत ठराविक वेळेतच होणार कांद्याचे लिलाव

दत्ता इंगळे
Saturday, 24 October 2020

सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने प्रतवारी करुन विक्रीसाठी आणावा, असेही यामध्ये आवाहन केले आहे.

नगर तालुका ः कांद्याला सध्या चांगला दर मिळू लागला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा आहे ते शेतकरी बाजार समितीत कांदा आणत आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्याप्रमाणात वाहनांची गर्दी होत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन बाजार समितीकडून केले जात आहे. कांदा लिलावासाठी दिवस व वेळ ठरवून दिले आहेत. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्यातून सोमवार, गुरुवार व शनिवारी कांदा लिलाव होतो. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून बाजार समितीने शेतकऱ्यांना काही नियम घालुन दिले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी वाजेपर्यंत च कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

याबाबत काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, कांदा लिलावाच्या दिवशी म्हणजे सोमवार, गुरुवार व शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच कांदा विक्रीसाठी आणावा. 8 वाजल्यानंतर लिलाव प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वाहनास यार्डमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत. यार्डामध्ये मास्क वापरावे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. 

सध्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने प्रतवारी करुन विक्रीसाठी आणावा, असेही यामध्ये आवाहन केले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The onion auction will be held at the Nepti market committee on time