कांदा महागला, बियाण्याचेही भाव दुप्पट; शेतकऱ्यांच्या दुकानासमोर रांगा

दत्ता इंगळे
Friday, 25 September 2020

बियाणे तुटवड्यामुळे गेल्यावर्षी साधारण दोन हजार रुपये किलोने मिळणाऱ्या गावरान बियाण्यासाठी यंदा सा डेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

नगर तालुका ः गेल्या वर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे पुरेशा क्षमतेने कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी, यंदा गावरान कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुपटीपेक्षा जास्त दराने ते विकले जात आहे. मात्र, जादा पैसे मोजूनही कांदाबियाणे मिळेनासे झाले.

नगरच्या मार्केटयार्डात कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यानेही कांदाबियाणे पुरवठा होत नसल्याचे विक्रेते सांगतात. शेतकऱ्यांकडेही यंदा बियाण्याचा तुटवडा आहे.

जिल्ह्यात खरीप व उन्हाळी कांद्याची साधारण लागवड होते. गेल्या वर्षी अवकाळी पावसाने साथ दिल्याने, कांदा लागवड वाढली. गतवर्षी नगर जिल्ह्यात सुमारे 1 लाख 40 हजार हेक्‍टरवर कांदा लागवड झाली. सध्या खरीप, रांगडा कांद्याची लागवड सुरू आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांना औरंगाबाद, नाशिक, पुणे, जालना भागातून कंपन्या कांदाबियाणे पुरवितात.

गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा जोर, सतत बदलत्या वातावरणामुळे बीजोत्पादन झाले नाही. परिणामी, यंदा कांदाबियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. सततच्या पावसाने शेतातच बियाणे सडले. उगवलेले रोपही खराब झाले. त्यामुळे गाठीशी असलेले कांदाबियाणे संपल्याने शेतकऱ्यांना नवीन बियाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

बियाणे तुटवड्यामुळे गेल्यावर्षी साधारण दोन हजार रुपये किलोने मिळणाऱ्या गावरान बियाण्यासाठी यंदा साडेतीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. दीड हजार रुपये किलोने मिळणारा रांगडा कांदा यंदा दोन ते अडीच हजार रुपये झाला आहे. विशेष म्हणजे, दुप्पट पैसे मोजूनही बियाणे मिळेनासे झाले आहे. 

कांदा रोपाचे पावसाने नुकसान 
साधारण जून, जुलैमध्ये रोपे टाकून खरिपात गावरान कांदालागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने लावणीला आलेल्या रोपांचे नुकसान होत आहे. बहुतांश रोप पावसामुळे वाया गेले आहे. त्याचा कांदालागवडीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यभर पावसाने कहर केल्याने, कांदाबियाणे वाया गेले. दुबार लागवडीसाठी नव्याने बियाणे खरेदी करावी लागल्याने व मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्यामुळे बियाण्याचे दर वाढले आहेत. 
- अजय बोरा, बियाणे व्यापारी 

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion became more expensive, seeds also doubled; Queues in front of farmers' shops