कर्जतचे शेतकरी तुटून पडले कांद्यावर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

तालुक्यात खरिप, लेट खरिप व उन्हाळी कांद्याची मिळून साधारण सहा हजार हेक्टरपेक्षा आधिक क्षेत्रावर लागवड होत असते. गेल्यावर्षी तर ही लागवड नऊ हजार हेक्टरपर्यत गेली होती. यंदा सातत्याने कांदा दराचा प्रश्न उपस्थित होत असला तरीही कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.

कर्जत :तालुक्यात दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता कांदा लागवडीला पुन्हा सुरवात झाली आहे. यंदा बहूतांश भागात कांदा लागवड ठिबक सिंचनवर करण्यालाही प्राधान्य दिले जात आहे. यंदा पहिल्यांदाच कांदा बियाणांचा तुटवडा झाला आहे.

शिवाय गेल्या महिनाभरात सातत्याने पाऊस झाल्याने रोपांचीही तुटवडा झाला आहे.या वेळी शेतकऱयानी पारंपरिक पिकांना छेद देत फळबागा,ऊस व कांद्याला प्रथम पसंती दिली आहे.चांगले पर्जन्यमान आणि सीना धरणासह कुकडीचे क्षेत्रातील धरणे ओसंडून वहात असल्याने नगदी पिकाकडे शेतकरी वळले असल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात खरिप, लेट खरिप व उन्हाळी कांद्याची मिळून साधारण सहा हजार हेक्टरपेक्षा आधिक क्षेत्रावर लागवड होत असते. गेल्या वर्षी तर ही लागवड नऊ हजार हेक्टरपर्यंत गेली होती. यंदा सातत्याने कांदा दराचा प्रश्न उपस्थित होत असला तरीही कांदा लागवडीवर शेतकऱ्यांचा भर दिसत आहे.

लेट खरिपात आणि रब्बीत कांदा लागवडीचे क्षेत्र अधिक असते. आता रब्बीच्या कांदा लागवडीला सुरवात झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पाऊस सुरु होता. त्यामुळे कांदा लागवड बंद होती. दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने कांदा लागवड पुन्हा सुरु झाली.

दरम्यान, बियाणे मिळेना, रोपांचेही नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. केवळ बियाणे आणि रोपे वेळेत मिळाले नाही तर कांदा लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. यंदा पारंपारिक लागवडीसोबत ठिबकवर कांदा लागवडीलाही भर दिला जात आहे. दरम्यान टंचाई निर्माण करीत कांदा बियाणांचा काळाबाजार केला जात असल्याने मुख्य कांदा वितरकांचीच चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
 

यंदा सुरुवातीला पर्जन्यमान अतिशय चांगले आहे तसेच शेतकरी पाणी बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करीत आहेत ही समाधानाची बाब आहे.कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने या वर्षी लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

- दीपक सुपेकर,तालुका कृषी अधिकारी, कर्जत , अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion cultivation in Karjat increased significantly