डोंगरगणच्या शेतकऱ्याने लक्ष्मीपूजनाला पूजला कांदा

चंद्रभान झरेकर
Sunday, 15 November 2020

दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. सणाच्या मुख्य दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. अनेक जण नवनवीन वस्तूखरेदी करतात. यंदा पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली.

नगर ः अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना कांदारोपे मिळणेही दुर्लभ झाले. त्यामुळे यंदा डोंगरगण (ता. नगर) येथील शेतकऱ्याने कांदापिकाचेच पूजन केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर "व्हायरल' झाले असून, त्याची मोठी चर्चा आहे. 
दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. सणाच्या मुख्य दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केले जाते. अनेक जण नवनवीन वस्तूखरेदी करतात. यंदा पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या; पण काही केल्या पाऊस थांबण्याचे नावच घेत नव्हता.

हळूहळू शेतकरीही "बस कर बाबा' असे म्हणू लागले. दसराही पावसात न्हाऊन निघाला. परिणामी, पिकांचे मोठे नुकसान झाले. या अतिवृष्टीचा कांदारोपांनाही फटका बसला. त्यामुळे उन्हाळी कांदालागवडीसाठी आता रोपांची टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांवर कांदा पेरणीची वेळ आली. 

अतिवृष्टीतून बचावलेल्या कांद्याची अनेक ठिकाणी लागवड करण्यात आली. तशीच लागवड डोंगरगण (ता. नगर) येथील शेतकरी शंकर चांदणे यांनी केली होती.

पावसातून बचावलेल्या या कांद्याचे चांदणे यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनोभावे पूजन केले. या पूजनाचे छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिवाळीला कांदापूजन करण्याचा हा प्रकार अनोखा आहे. जिल्ह्यात यापूर्वी शेतकऱ्यांकडून शेती औजारांचे पूजन करीत. मात्र, यंदा प्रथमच एखाद्या पिकाचे पूजन करण्यात आले. 
 

दरवर्षी इतर पिकांसह कांदाउत्पादन घेतो. इतर पिकांच्या तुलनेत आम्हाला कांद्यानेच तारले आहे. कांद्यातूनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. कांदापिकाबद्दल आत्मीयता व्यक्‍त करण्यासाठी दिवाळीला पिकाचे पूजन केले. 
- शंकर चांदणे, शेतकरी, डोंगरगण, ता. नगर 

शेतकऱ्यासाठी पीक "लक्ष्मी'च 
कांदाभावात अचानक वाढ झाल्यावर अनेक जण सोशल मीडियातून खिल्ली उडवितात. मात्र, शेतकऱ्यासाठी कोणतेही पीक "लक्ष्मी'च असते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदारोपांच्या पूजनाचे छायाचित्र मोजक्‍या शब्दातील संदेशासह सोशल मीडियावर व्हायरल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion farmers worship Lakshmi Puja onions