कांद्याला आला सफरचंदाचा भाव, कांदा साधला तर शिकार नाही तर भिकार

मार्तंड बुचुडे
Monday, 19 October 2020

सध्या तालुक्यात सातत्याने पाऊस झाल्याने अनेकांचे कांदा पीक वाया गेले आहे. कांदा रोपेही खराब झाल्याने कांदा लागवडही करता आली नाही. तसेच आता काही ठराविक शेतक-यांकडेच कांदा शिल्लक आहे. आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांना आनंद झाला आहे.

पारनेर ः  कांद्याचे दर सध्या चढे आहेत. सर्वसामान्यांना हे दर आवाक्याबाहेर गेल्याचे वाटते आहे. शेतकऱ्यांच्या हाती चांगला पैसा खुळखुळतोय, हेही खरे आहे. परंतु हे पीक म्हणजे साधले तर शिकार नाही तर भिकार अशी स्थिती आहे. पारनेर तालुक्यात सध्या शेतकऱ्यांना हीच प्रचिती येत आहे. कांद्याला सफरचंदाचा भाव आल्याने शेतकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज (ता.18) कांद्यास उच्चांकी आठ हजार रूपये प्रतिक्विंटलला भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

काल झालेल्या कांदा लिलावामध्ये प्रथम क्रमांकाच्या कांद्याला प्रतिकिलो 80 रूपये तर इतर कांद्यास 65 ते 75 रूपये व त्या खालोखाल 55 ते 65 रूपये असा दर मिाळाला. या वर्षीच्या  हंगामातील हा पारनेर बाजार समितीमधील हा उच्चांकी बाजार भाव आहे.  

सध्या तालुक्यात सातत्याने पाऊस झाल्याने अनेकांचे कांदा पीक वाया गेले आहे. कांदा रोपेही खराब झाल्याने कांदा लागवडही करता आली नाही. तसेच आता काही ठराविक शेतक-यांकडेच कांदा शिल्लक आहे. आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने ज्यांच्याकडे कांदा आहे, त्यांना आनंद झाला आहे. मात्र, अनेकांचे कांदा पीक वाया गेल्याने अनेक शेतकरी नाराज झाले आहेत.

आज कृषी उत्पन्न बाजार समितीत नऊ हजार 735 कांदा गोण्यांची आवक झाली. तर वाघुंडे येथील शिवाजी दिवटे यांच्या प्रथम क्रमांकाच्या कांद्याला काल आठ हजार रूपये प्रती क्विंटल दर मिळाला. मात्र, या शेतक-याचे फक्त 13 गोणी कांद्याचा छोटा वक्कल असल्याने त्यास अधिक बाजार मिळाल्याची चर्चा शेतक-यांमध्ये झाली.

दुस-या क्रमांकाच्या कांद्यास सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तिस-या  क्रमांकाच्या कांद्यास सहा हजार पाचशे ते पाच हजार पाचशे असा बाजारभाव मिळाला.

या हंगामातील हा भाव उच्चांकी असल्याने व अता बाजार भाव वाढणार आहेत. या अशेने शेतकरी आनंदी झाले आहेत. मात्र, नव्याने लावलेले कांदा पीक अति पावसामुळे वाया गेले आहे. बहुतेक शेतक-यांकडे आता जुना कांदा शिल्लक नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाबरोबर काही शेतक-यांमध्ये मात्र नाराजी निर्माण झाली आहे.
     

मी अवघा अर्धा एकर कांदा केला होता, तो तसाच दगडी चाळीत ठेवला होता. त्या पैकी या पूर्वी निम्मा कांदा 13 ते 15 रूपयांनी विकला. आज मात्र 80 रूपये प्रती किलो दराने विकला. माझ्या कांद्याला रंग खूप चांगला होता. त्यामुळे चांगला बाजारभाव मिळाला. मात्र, या पीकाचे काही खरे नाही. मी नुकताच नवीन 20 हजार रूपये खर्च करून लावलेला एक एकर कांदा पावसामुळे खराब झाला. त्यामुळे नांगर फिरवावा लागला.

- शिवाजी दिवटे, कांदा उत्पादक शेतकरी वाघुंडे
     
अनेक राज्यातील कांदा पीक अतिपावसामुळे वाया गेले आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. तसेच जुना कांदा आता शेतक-यांकडे  शिल्लक राहिला नाही. परिणामी आगामी काळात ही कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

- प्रशांत गायकवाड, सभापती कृषी उत्पन्न बाजार, समिती.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion got the price of apple