esakal | लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; नगर जिल्ह्यात लसीकरणाचा सावळा गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र; लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

sakal_logo
By
राजू घुगरे

अमरापूर (जि.अहमदनगर) : कोरोना लसीकरणासाठी आलेल्या नागरिकाला लस न घेताच ऑनलाइन प्रमाणपत्र मिळाल्याचा धक्कादायक प्रकार भातकुडगाव (ता.शेवगाव) येथील आरोग्य केंद्रात घडला. विशेष म्हणजे येथील केंद्रावर मे महिन्यात पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची ऑनलाइन नोंदणी न केल्याने दुसऱ्या डोसबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच लस न मिळताच थेट प्रमाणपत्रच मिळाल्याने लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. (Online-certificate-without-vaccination-marathi-news-jpd93)

लसीकरणाचा सावळा गोंधळ उघडकीस

याबाबत समजलेली हकिगत अशी, भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी असलेले आदित्य अण्णासाहेब नजन यांनी ता. 3 जुलै रोजी कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यानुसार ते भातकुडगाव येथील आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी 3 जुलै रोजी तेथे 10.30 वाजता गेले होते. त्यावेळी तेथे प्रथम 45 वयापुढील नागरीकांना लस देण्यास सुरवात केली व 18 ते 44 वयोगटातील नागरीकांना नंतर लस देण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र गर्दी वाढल्याने त्यांना लस मिळाली नाही. त्यानंतर ता. 7 जुलै रोजी भातकुडगाव आरोग्य केंद्राअंतर्गत सामनगाव उपकेंद्रात 200 डोस उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्याने नजन तेथे लस घेण्यासाठी गेले. मात्र तेथे स्थानिक नागरिकांची संख्या जास्त असल्याने तेथेही त्यांना लस मिळाली नाही.

वैद्यकीय अधिकारींकडून उडवाउडवीची उत्तरे

मात्र त्यानंतर त्यांना ता. 9 जुलै रोजी लस घेतल्याबाबतचा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला. त्यावर दिलेल्या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर त्यांना कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. या सर्व प्रकारामुळे ते चक्रावून गेले. व लस न घेताच प्रमाणपत्र मिळाल्याने त्यांना, यापुढे लस मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ही बाब त्यांनी संबंधित आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यापूर्वीदेखील या आरोग्य केंद्रात लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या काही नागरिकांना कुठलाही संदेश व प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्या नागरिकांच्यादेखील लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच लस न मिळताच प्रमाणपत्र मिळाल्याच्या प्रकारामुळे आरोग्य केंद्रातील हलगर्जी कारभार उघडकीस आला आहे.

स्पॉट रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस

लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करताना अनेक नागरिकांकडून व्हॅक्सिनेशनवर क्‍लिक केल्याने सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याने लस न मिळतादेखील प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट केले जाते. ही फारशी गंभीर बाब नाही. संबंधित व्यक्तीस स्पॉट रजिस्ट्रेशन केल्यानंतर लस देण्यात येईल. - कैलास कानडे, तालुका आरोग्य अधिकारी, शेवगाव

हेही वाचा: श्रीगोंद्यात भाजप-काँग्रेस कामाला, राष्ट्रवादीत शांतता!

हेही वाचा: वधूसह नातेवाइकांना पोलिसी पाहुणचार! चौघांना अटक

loading image