
इंजेक्शनसाठी या असल्या लोकांच्या नादाला लागू नका
नगर ः कोरोनाबाधितांचे नातेवाईक कुठून तरी जुगाड करून रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करतात. मात्र, त्याच्या या असाहतेचा फायदा घेणारेही महाभाग आहेत. अॉनलाईन जाहिरात करून लोकांना लुटण्याचा त्यांनी नवाच फंडा काढला आहे.
गंभीर कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी आवश्यक असणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्याच्या आमिषाने फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमावर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी 8110053558 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याबाबतचा संदेश सध्या व्हायरल होत आहे. या मोबाईल क्रमांकासह तमिळनाडूतील हेट्रो लॅब लिमिटेडचा हा क्रमांक असून, महाराष्ट्र बॅंकेतील खाते क्रमांक दिला आहे.
या खात्यावर पैसे जमा केल्यास दोन ते तीन तासांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल, असे खोटे आश्वासन दिले जात आहे.
याबाबत नगर जिल्ह्यात काही व्यक्तींची फसवणूक झाली आहे. एका जागरूक नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजमाध्यमाद्वारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन विक्रीस बंदी ः कोळी
रेमडेसिव्हिर इंजेक्शन समाजमाध्यमातून विक्री करण्यास पूर्णपणे बंदी आहे. समाजमाध्यमावर या स्वरूपाचे मेसेज हे फसवणूक करणाऱ्याच्या उद्देशाने व्हायरल केले जात आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रतीक कोळी यांनी केले आहे.
Web Title: Online Fraud For Remedivir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..