शिर्डीत ७ डिसेंबरला होणार ऑनलाइन नगराध्यक्षाची निवड

सतिश वैजापूरकर
Saturday, 28 November 2020

कोविडमुळे नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे.

शिर्डी (अहमदनगर) : कोविडमुळे नगरपंचायतीच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्षांची निवड व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या ७ डिसेंबरला होणाऱ्या विशेष सभेचा कार्यक्रम जाहीर केला.

नगराध्यक्ष निवडीसाठी निवडणुकीची वेळ आल्यास, प्रत्येक सदस्याने खोलीत एकटे बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मतदान करायचे आहे. मावळत्या नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. 

विशेष सभेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांना कळविले आहे. त्यानुसार पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे काम पाहतील. कामकाज सुरू होण्यापूर्वी प्रत्येक सदस्य त्याच्या खोलीत एकटाच असल्याची खात्री पिठासीन अधिकारी करणार आहेत. त्यासाठी सदस्यांनी आपल्यासमोरील कॅमेरा 360 अंशात फिरवून दाखवायचा आहे. कॅमेरा आणि सदस्यांतील अंतर सहा फूट ठेवावे. त्यात आवश्‍यक तो बदल केला तरी चालेल; मात्र हे अंतर अधिक ठेवून सदस्य ओळखता येणार नाही, अशी स्थिती नसावी. सभेचे व्हिडीओ रेकॉर्डींग होत असल्याची खात्री पिठासीन अधिकाऱ्यांनी करावी, आदी सूचना केल्या आहेत. 

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १ डिसेंबरपर्यंत आहे. त्याच दिवशी छाननी होईल. ३ डिसेंबरपर्यंत अपिल करण्याची मुदत आहे. ४ डिसेंबरपर्यंत माघार घेता येईल, तर ७ डिसेंबरला नव्या नगराध्यक्षांची निवड होणार आहे. नगरपंचायतीवर विखे गटाचे वर्चस्व आहे. नगराध्यक्षपदासाठी मूळ भाजपचे असलेले शिवाजी गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, अशोक गोंदकर व सुजित गोंदकर ही नावे चर्चेत आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online mayoral election will be held on 7 December in Shirdi