संगमनेरमध्ये बाराशेपैकी केवळ 12 शाळा सुरू

आनंद गायकवाड
Tuesday, 1 December 2020

राज्य सरकारच्या निर्देशानुसार 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले.

संगमनेर (अहमदनगर) : राज्य सरकारच्या निर्देशानुसार 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. मात्र, शिक्षकांची रखडलेली कोरोना चाचणी, प्रलंबित अहवाल व विद्यार्थी-पालकांमध्ये कोरोनाबाबत असणारी भीती, या मुळे आठवडाभरात तालुक्‍यातील सुमारे सव्वाशे पैकी केवळ 12 विद्यालये सुरू झाली. त्यातही दीड टक्का विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. 

तालुक्‍यात कोविडबाधितांची संख्या पाच हजारांवर गेल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याची पालकांची मानसिकता नाही. स्थानिक व्यवस्थापन समिती व पालकांचे "ना हरकत' प्रमाणपत्र घेऊनच विद्यार्थ्यांनी शाळेत यावे, असे सांगितले होते. तत्पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणीच्या सक्त सूचना केल्या होत्या. मात्र, किटचा तुटवडा असल्याने तालुक्‍यातील 1891 पैकी आजवर 944 कर्मचाऱ्यांचीच तपासणी झाली आहे. त्यातील आठ शिक्षक बाधित आढळले आहेत. 

शाळा व्यवस्थापनाकडे आतापर्यंत केवळ 3795 विद्यार्थ्यांच्या (12.16 टक्के) पालकांनी संमतीपत्र दाखल केले आहे. त्यामुळे 12 शाळांमध्ये केवळ 419 (1.34 टक्के) विद्यार्थ्यांची उपस्थित राहत असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांनी दिली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 12 out of 1200 schools in Sangamner are open