साखरेला बाजारपेठेत चांगला दर मिळाला तरच ऊसउत्पादकांनाही योग्य मोबदला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

कारखाना कार्यक्षेत्रात यंदा ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच या वेळच्या गळीत हंगामात केदारेश्वर साखर कारखान्याचे पाच लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.

बोधेगाव (अहमदनगर) : कारखाना कार्यक्षेत्रात यंदा ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळेच या वेळच्या गळीत हंगामात केदारेश्वर साखर कारखान्याचे पाच लाख टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. साखरेला बाजारपेठेत चांगला दर मिळाला तर ऊसउत्पादकांनाही योग्य मोबदला देता येईल. त्यासाठी केंद्र सरकारने साखर धोरणाबाबत योग्य निर्णय घेणे आवश्‍यक आहे. 

केदारेश्‍वर साखर कारखान्याची उपपदार्थनिर्मितीकडे वाटचाल सुरू असून, त्याद्वारे ऊसउत्पादकांना उसाला चांगला दर देता येणे शक्‍य होईल, असे प्रतिपादन "केदारेश्वर'चे अध्यक्ष ऍड. प्रताप ढाकणे यांनी केले. 

केदारेश्वर कारखान्याच्या गळीत हंगामातील पाच हजार एकशे एकाव्या साखरपोत्याचे पूजन डॉ. सुनील जाधव, डॉ. पोपट कर्डिले, डॉ. प्रसन्न खणकर, डॉ. दीपक देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त ते बोलत होते. उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट, संचालक बाबूराव घोडके, श्रीकिसन पालवे, बाळासाहेब फुंदे, राजेंद्र विठ्ठल अभंग, सुरेश होळकर, रणजित घुगे, माधव काटे, त्रिंबक चेमटे, संदीप बोडखे, सतीश गव्हाणे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर दसपुते, मयूर हुंडेकरी, रमेश गर्जे, अश्विनकुमार घोळवे, तीर्थराज घुंगरड, प्रवीण काळे, के. डी. गर्जे, पोपट केदार उपस्थित होते. 

ढाकणे म्हणाले, ""मागील वर्षी व याही वर्षी पाऊस चांगला झाल्याने कार्यक्षेत्रात उसाची कमतरता भासणार नाही. कारखान्याकडे नोंदविलेल्या उसाच्या गाळपाचे नियोजन योग्य रीतीने करण्यात आले आहे. कारखान्याच्या प्रशासकीय समस्यांचाही निपटारा केला आहे. हा कारखाना ऊसतोडणी कामगारांची कामधेनू म्हणून राज्यात ओळखला जातो. त्यामुळे कसल्याही परिस्थितीमध्ये या संस्थेला बाधा पोचू दिली जाणार नाही.'' 
ऋषिकेश ढाकणे यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only if sugar gets a good price in the market cane growers get a fair price