नगरच्या दीड हजार किलोमीटर रस्त्यासाठी मागवले अवघे नऊ कोटी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

रस्त्यांच्या डागडुजीसाठी, खड्डे बुजविण्यासाठी सुमारे 9 कोटींचा खर्च गृहीत धरून प्रस्ताव पाठविला आहे. पुलांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला आहे.

नगर ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे 1447 किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांना सुमारे नऊ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पाठविला आहे. 

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह रस्ते, पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या रस्त्यांनाही मोठा फटका बसला. सुमारे 1447 किलोमीटर रस्त्यांची दुरवस्था झाली. त्यात काही पुलांचाही समावेश आहे.

काही रस्त्यांची दुरुस्ती, तर काही रस्ते पुन्हा तयार करावे लागणार आहेत. काही पूल पुन्हा उभारावे लागतील. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या दुरुस्तीसाठी सुमारे 140 कोटींचा खर्च गृहीत धरून तसा अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर केला होता. मात्र, जास्त निधीची मागणी केल्याचे सांगून फेरप्रस्ताव सादर करण्याची सूचना विभागीय कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने सुधारित प्रस्ताव तयार केला आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा पवारांच्या पंतप्रधानपदासाठी संकल्प

रस्त्यांच्या डागडुजीसाठी, खड्डे बुजविण्यासाठी सुमारे 9 कोटींचा खर्च गृहीत धरून प्रस्ताव पाठविला आहे. पुलांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला असून, त्यावर विभागीय आयुक्त कार्यालय कार्य निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली. रस्त्यांची डागडुजी करून भागणार नाही. अनेक ठिकाणी नव्यानेच रस्ते तयार करावे लागणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी भरीव निधी देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्यांमधून होत आहे. 

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांची दुरुस्ती व पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारा निधी मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 
- काशिनाथ दाते, सभापती, बांधकाम व कृषी समिती , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only Rs 9 crore was ordered for 1,500 km of roads in the Nagar