ग्रामपंचायतीची निवडणूक नको रे बाबा; अर्ज करण्याची किचकट प्रक्रियेमुळे संताप

सुहास वैद्य
Tuesday, 29 December 2020

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अर्ज करण्याच्या किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे निवडणूक नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर आली आहे.

कोल्हार (अहमदनगर) : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अर्ज करण्याच्या किचकट व वेळखाऊ प्रक्रियेमुळे निवडणूक नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ इच्छुक उमेदवारांवर आली आहे. सलग तीन दिवसांच्या सुट्यामुळे बँका व सेतू कार्यालयात त्यांची गर्दी झाली होती. अशातच ऑनलाईन अर्ज भरताना सर्वर डाऊनचे विघ्न उभे राहिले आणि इच्छुकांची खूपच धांदल उडाली.

अर्ज भरण्याची मुदत 30 तारखेपर्यंत आहे. अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे फोर्म भरण्यासाठी धावपळ सुरु आहे. 

उमेदवारांनाच तगडे राजकीय पाठबळ आहे त्यांची फोर्म भरण्याची प्रक्रिया परस्पर आणि विना सायास होत आहेत. परंतु ज्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली ते मात्र हतबल दिसत आहेत. कारण धावपळ करून फॉर्म भरायचा आणि किरकोळ त्रुटीवरून तो बाद झाला तर मनस्ताप सहन करायचा अशी धास्ती त्यांच्या मनात आहे. शुक्रवारी नाताळची त्यानंतरचा चौथा शनिवार व रविवार अशा सुट्ट्यामुळे बँका व सरकारी कार्यालय बंद होते. राहाता तालुक्यात 

25 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. निवडणुका होणार कि बिनविरोध होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी गावोगावची अनेक जण उमेदवारीसाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. निवडणुकीला उभे राहू इच्छीणाऱ्यांसाठी नियमावली देण्यात आली आहे. फोर्म भरण्याची प्रक्रिया एवढी किचकट आहे. सामान्य माणूस निवडणुकीपासून चार हात राहणेच पसंत करीत आहे. कारण त्याला कुटुंबाची व स्वत:च्या संपत्तीचे विवरण द्यावे लागत आहे.

उमेदवाराची शैक्षणिक माहिती देताना तो कधी उत्तीर्ण झाला. किती टक्के गुण मिळाले होते, याशिवाय इतरही बाबींची पूर्तता करताना उमेदवारांच्या नाकीनाव येत आहेत. नियमावलीमध्ये राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल्ड बँकेतच खाते उघडण्याचा नियम करण्यात आला आहे. काही बँकांमध्ये कनेक्टीव्हिटी नसते आणि यंत्रणा सुरळीत सुरु असणाऱ्या काही बँका नवीन खाते उघडणाऱ्याकडे दुर्लक्ष करून नियमित कामांनाच प्राधान्य देत आहेत. त्यामुळे खाते उघतांना अडचणी येत आहेत. 

ऑनलाईन एक फोर्म भरताना एक-दीड तास लागतो. पोलिस व्हेरिफिकेशनसाठी शाळा सोडल्याच्या दाखल्याची सक्ती अडचणीची ठरत आहे. जातपडताळणी सुरु असलेल्या वेबसाईटवर समस्या सुरु असल्याने उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. 

खाते उघडण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची नेहमीप्रमाणे उदासीनता आहे. वेगवेगळी कारणे सांगून या बँका खाते उघडण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यापेक्षा शेड्यूल्ड बँकांपैकी प्रवरा सहकारी बँक व नगर अर्बन बँक चांगले व तत्पर सहकार्य करीत आहेत.
- ज्ञानेश्वर खर्डे, उपसरपंच, कोल्हार बुद्रुक 

संपादन : अशोक मुरुमकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only two days to fill the application for Gram Panchayat election