esakal | कोरोनाच्या भीतीवर मात करीत संगमनेरातील जनजीवन पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

Overcoming the fear of corona and preceding public life in Sangamner

नगर शहरानंतर सर्वाधिक रुग्ण आढळणारा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जात होता.

कोरोनाच्या भीतीवर मात करीत संगमनेरातील जनजीवन पूर्वपदावर

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : नगर शहरानंतर सर्वाधिक रुग्ण आढळणारा तालुका म्हणून संगमनेर तालुका ओळखला जात होता. मात्र सात महिन्यांच्या काळात आरोग्य विभाग व प्रशासनाने विविध टप्प्यावर केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे तालुक्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

सुमारे सात महिन्यांपूर्वी देशासह राज्यात कोविड 19 च्या प्रादुर्भावाला सुरवात झाली. विविध वाहिन्यांवर सातत्याने सुरु असलेल्या जगभरातील कोरोना प्रादुर्भावाच्या बातम्यांचा रतीब पाहिल्याने, जनमाणसात कोरोनाविषयी प्रचंड भिती निर्माण झाली होती. या पार्श्वभुमिवर तालुक्य़ात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी प्रशासनाने सक्तीने उपाययोजना लागू केल्या होत्या मात्र तरीही दुर्दैवाने शहरातील दोन व तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक अशा तिघांपासून तालुक्यात कोरोनाचा चंचूप्रवेश झाला.

त्यानंतर पुणे, नाशिक, मुंबई या महानगराशी संपर्क साधण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या संगमनेरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. प्रथम शहरातील विविध प्रभागात आढळलेल्या रुग्णांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोवीड प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, विविध सामाजिक व सेवाभावी संस्था, सहकारी साखर कारखाना, दुध संघ आदींसह सर्वांनी जमेल त्या स्वरुपात संयुक्तपणे लढा दिला. लॉकडाऊनपासून सुरु झालेला प्रवास अनलॉकपर्यंत पोचला.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार सुरु झालेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत जवळपास सर्व आस्थापना, बाजारपेठ सुरु झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी दैनंदिन खरेदीसाठी तालुकाभरातून येणाऱ्या ग्रामस्थांमुळे कोरोना तालुक्यातील 172 महसुली गावांपैकी कालपर्यंत 145 गावांमध्ये पोचला होता. आजवर 3 हजार 671 रुग्णांपैकी 3 हजार 287 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 91.38 टक्के आहे. आजवर 384 रुग्ण अँक्टीव्ह असून, सात महिन्यात 38 मृत्यू झाले आहेत. मृत्यूचे प्रमाण केवळ 1.06 टक्के आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीमुळे कोरोनाची भीती जवळपास नष्ट झाल्याने, शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. 

आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील 4 लाख 86 हजार 661 लोकसंख्या व 97 हजार 889 कुटूंबापैकी सुमारे 65 ते 70 हजार कुटूंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या अंतर्गत रक्तातील प्राणवायू, हृदयगती, तापमान मोजून दुर्धर आजारांची माहिती संकलित केली जात आहे. या सर्व्हेत 1 हजार 746 संशयितांच्या स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 296 जण पॉझिटीव्ह आढळले. चाचण्यांची संख्या वाढल्याने सध्या मोठ्या प्रमाणात लक्षणे नसलेले रुग्ण सापडत आहेत.
- डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image