esakal | कामी आली पवार पॉवर ः आरोळेंच्या कोविड सेंटरला मोफत अॉक्सीजन

बोलून बातमी शोधा

oxygen machines
कामी आली पवार पॉवर ः आरोळेंच्या कोविड सेंटरला मोफत अॉक्सीजन
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

जामखेड : जामखेड ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कोविड सेंटरला शासनाकडून विनाशुल्क ऑक्‍सिजन पुरवठा करण्यासंदर्भात निर्णय निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला. या निर्णयामुळे कोविड सेंटरची सर्वांत मोठी अडचण दूर झाली. यासाठी आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता.

जामखेडचे कोविड सेंटर शासनस्तरावरुन हस्तांतर करण्यात आल्यानंतर मागील वर्षभरापासून सेंटरचे प्रमुख रवी आरोळे हेच मोठ्या प्रमाणात खर्चाचा भार उचलित होते. दररोज तब्बल दीड लाखाहून अधिक रुपये खर्च होत होते. त्यातील सर्वाधिक पैसे ऑक्‍सिजन पुरवठ्यावरच खर्च व्हायचे. याची माहिती समजल्यानंतर नागरिकांनी या कोविड सेंटरला हातभार लावला. मात्र, खर्चाचा भार व मिळणारी मदत, यामध्ये मोठी तफावत होती. व्यवस्थापनाने प्रकल्पाची सुरक्षा ठेव व "स्थावर मालमत्ता रुग्णांच्या मोफत खर्चासाठी वापरली. आमदार रोहित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनीही मदत पुरविली.

विविध संघटना, राजकीय पक्ष, नागरिकांची आजही मदत सुरू आहे. आमदार पवारांनी येथील बेडची संख्या आणि दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून येथे जम्बो कोविड सेंटर उभारलंय. त्यामुळे याठिकाणी आज तब्बल साडेसहाशे रुग्ण उपचार घेत आहेत. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, आमदार पवारांचा पाठपुरावा यामुळे या सेंटरसाठी ऑक्‍सिजन विनामूल्य पुरविण्यासंदर्भात निर्णय झाला.

"आई-वडिलांची इच्छा होती विनामूल्य रुग्ण सेवेचे व्रत कायम जपावे; त्याच धर्तीवर आपण काम करीत आहोत. या महामारीत येथील माणसे वाचली पाहिजेत, जगली पाहिजेत याकरिता वाटेल ती किंमत चुकविण्याची वेळ आली, तरी आपण मागे हटणार नाही.

-डॉ. रवी आरोळे, संचालक, ग्रामीण आरोग्य प्रकल्प

बातमीदार - वसंत सानप