आली आली एसटीची पॅकेज टूर आली, थेट गावात घ्यायला येणार बस

दौलत झावरे
Sunday, 3 January 2021

कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा तोटा झालेला आहे. तो भरून काढण्यासाठी व प्रवाशी आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत.

नगर ः पर्यटनासह तीर्थदर्शन करण्याची अनेकांच्या मनात इच्छा असते. मात्र वेळ व पैशांचे गणित जुळत नसल्याने मनातील इच्छा मनातच राहत होत्या. अशाच लोकांच्या मनातील स्वप्न पूर्ण करण्याचे काम आता राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाने "पॅकेज टूर'च्या माध्यमातून हाती घेऊन उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू केलेले आहे. 

कोरोना महामारीमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा तोटा झालेला आहे. तो भरून काढण्यासाठी व प्रवाशी आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांत विभागीय पातळीवर वेगवेगळे उपक्रमही हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये नगरचे विभाग नियंत्रक विजय गिते यांनी पर्यटन व तीर्थक्षेत्र दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक व पर्यटकांसाठी "पॅकेज टूर' संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुखांची बैठक घेऊन ही योजना जाहीर केलेली आहे. तसे नियोजनही करून प्रत्येक आगारातून तीर्थक्षेत्रासाठी खास बस सोडण्यात येऊ शकतात, याचे नियोजन करून त्याचा प्रचार व प्रसार करण्यास सूचित करण्यात आलेले आहेत. 

या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान 44 असणे गरजेचे आहे. सर्व प्रवाशांना नेमके कोठे यायचे, याची सर्व माहिती घेऊन त्यांना तेथे जाण्यासाठी-येण्यासाठी लागणारे तिकिटाचे शुल्क आकारून त्यांना थेट गावातून बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पॅकेज टूरमध्ये एसटी प्रशासनाने फक्त एसटीच्या तिकिटाचे दर आकारलेले असून, मुक्काम व जेवण व नाष्ट्याचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे. 
 

तीर्थक्षेत्रासाठीचे साधी बसचे तिकिट दर 
तारकपूर ते अष्टविनायक ः 980 
तारकपूर ते कोकण दर्शन ः 1710 
शेवगाव ते भिमाशंकर दर्शन ः 865 
शेवगाव ते वेरुळ, घृष्णेश्‍वर दर्शन ः 425 
श्रीरामपूर ते अष्टविनायक दर्शन ः 1160 
कोपरगाव ते अष्टविनायक दर्शन ः 1235 
कोपरगाव ते अकरा मारुती दर्शन ः 1705 
पारनेर ते भीमाशंकर दर्शन ः 500 
पारनेर ते त्र्यंबकेश्‍वर दर्शन ः 745 
संगमनेर ते अष्टविनायक दर्शन ः 1080 
संगमनेर ते नाशिक दर्शन ः 440 
नेवासे ते अष्टविनायक दर्शन ः 1145 
नेवासे ते वेरुळ, भद्रामारुती दर्शन ः 500 
पाथर्डी ते पंढरपूर दर्शन ः 1020 
श्रीगोंदे ते अष्टविनायक दर्शन ः 900 
श्रीगोंदे ते पंढरपूर दर्शन ः 430 
श्रीगोंदे ते आळंदी दर्शन ः 300 
श्रीगोंदे ते नारायणपूर दर्शन 320 
अकोले ते कोकण दर्शन ः 2030 
अकोले ते तीन ज्योर्तिलिंग व दोन शक्तीपीठ ः 2030 
अकोले ते अष्टविनायक दर्शन ः 1100 

 

राज्यातील पर्यटन पर्यटनक्षेत्र व देवदर्शनासाठी जाणाऱ्यांनी बसची मागणी करताच त्यांना बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या "पॅकेज टूर'चा भाविक व पर्यटकांनी लाभ घ्यावा. 
- दादासाहेब महाजन, विभागीय वाहतूक अधिकारी. 
 

पर्यटनासह देवदर्शन करण्याची इच्छा असूनही अनेकांना करता येत नाही. त्यामुळे खास "पॅकेज टूर' योजना सुरू केलेली असून, या योजननेचा भाविक व पर्यटकांनी लाभ घ्यावा. 
- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Package Tour brought by Ahmednagar Division of ST