पहाता क्षणी वाटली बिबट्याची जोड पण ती निघाली... 

सनी सोनावळे
बुधवार, 29 जुलै 2020

पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथे ढुसदरा परिसरात दोन बिबट्या जोडीचे दर्शन झाले. मात्र हे बिबटे नसुन पट्टेरी वाघ असल्याची देखील चर्चा गावामध्ये रंगली आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथे ढुसदरा परिसरात दोन बिबट्या जोडीचे दर्शन झाले. मात्र हे बिबटे नसुन पट्टेरी वाघ असल्याची देखील चर्चा गावामध्ये रंगली आहे.

या जोडीचे नगर- कल्याण महामार्गावर असणाऱ्या वासुंदे चौकात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी निदर्शनास आले असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबतची व्हीडिओ क्‍लिक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत गावातील आनंद झावरे, बबलू झावरे, बंडु रांधवण, संदीप ढुस, सचिन ढुस, बबन ढुस, नामदेव ढुस यांनी वन विभागास निवेदन दिले. 

गावातील ढुसदरा, धुमाळवस्ती, नवोदय विदयालय, निवडुंगेवाडीसह परिसरात चार दिवसांपासून दुर्मीळ आढळणाऱ्या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दोन वाघ शांततेने ढुसदरा येथील डोंगराकडे जाताना या परिसरातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल साहेबराव भालेकर, वनपाल एम. एल. मोरे, वनरक्षक धर्मवीर तोरंबे, वनरक्षक विजय थोरात, वनरक्षक नाना जाधव यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून निवडुंगेवाडी व परिसरात लावलेला पिंजरा ढुसवस्तीवर लावला आहे. देसवडे येथेही एक बिबट्या मादी व दोन पिल्यांचा वावर वाढला होता. त्या ठिकाणी पिंजरा लावला असता एक पिल्लू पिंजऱ्यात जेरबंद झाले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pair of leopards in Takli Dhokeshwari in Parner taluka