अहमदनगर : पाठीत वार करीत नाही;पंकजा मुंडे

विधान परिषद निवडणुकीबाबत पंकजा मुंडे यांची संयत भूमिका
पंकजा मुंडे
पंकजा मुंडेsakal

पाथर्डी : ‘पक्षातील नेते, कार्यकर्ते व माझ्या वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे मी शांत आहे. कोणाच्याही पाठीत वार करणे हा माझा स्वभाव नाही. मी संयमी आहे. ज्यांना पदे मिळाली, त्यांना माझ्या शुभेच्छा,’ अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज आपल्या भावना संयतपणे व्यक्त केल्या.

मुंडे यांनी आज मोहटादेवीचे दर्शन घेतल्यानंतर देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, अरुण मुंडे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक दहिफळे, आजिनाथ आव्हाड उपस्थित होते. मुंडे यांचे आज त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले. त्यांच्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या मुकुंद गर्जे यांची त्यांनी भेट घेतली.

मुंडे म्हणाल्या,की कोणतेही पद नसताना एवढे भरभरून तुम्ही दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. मला पद मिळाले नाही म्हणून तुम्ही नाराज होऊ नका. (कै.) गोपीनाथ मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचे परळीत स्वागत करण्यासाठी ज्या ठिकाणी स्वागत कमानी उभारल्या, त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ माझ्यावर आली. मात्र, (कै.) मुंडे यांनी आपल्याला संघर्षाचा वारसा दिला आहे, तो टिकवायला हवा. कोणाचाही अवमान करणे हे मुंडेंच्या रक्तात नाही.

मी मंत्री असताना राज्यातील प्रत्येक गावात निधी दिला होता. आता पुन्हा एकदा संपूर्ण राज्याच्या दौरा करणार आहे. शेती, वीज, ओबीसी व मराठा आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांवर मला भाष्य करायचे आहे. कोणालाही संधी मिळाली म्हणून माझ्या पोटात गोळा आलेला नाही. माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या.

छत्रपतींचा इतिहास आठवा

छत्रपती शिवरायांनी केवळ पाच-दहा मावळे सोबत घेऊन इतिहास रचला होता. तुमच्यासारखे कार्यकर्तेच माझी ढाल व कवचकुंडले आहेत. तुमच्यासाठीच मी संयमाने जीवनात प्रत्येक पाऊल उचलत आहे. तुम्हीसुद्धा संयम ठेवा. आज ज्या राजकीय घडामोडी राज्यात सुरू आहेत, त्याविषयी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com