नेवाशात पपई बागांवर चालवली कुऱ्हाड

सुनील गर्जे
Thursday, 22 October 2020

बागेवर आजवर 60-70 हजार रुपये खर्च झाला. फळधारणा चांगली झाली; परंतु गेल्या पंधरवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या जोरदार पावसाचा पपईबागांना चांगलाच फटका बसला.

नेवासे : अतिवृष्टीमुळे पपईची फुले व फळगळ झाली. झाडांची मुळे कुजल्याने अनेक झाडे फळांच्या ओझ्याने कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. फळे खराब झाल्याने व्यापारीही बाग घेण्यास नकार देत असल्याने, हताश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी अखेर पपईबागांवर कुऱ्हाड चालवली. 

तालुक्‍यात अंतरवली, पाथरवाला, सुकळी, गिडेगाव, जेऊर हैबती, पिंप्री शहालीसह परिसरात सुमारे 50-60 एकरांवर शेतकऱ्यांनी पपईची लागवड केली आहे. कुकाणे येथील शेतकरी राजेंद्र म्हस्के यांनी एक एकरावर 1400, तर जेऊर हैबती येथील शेतकरी शंकर रिंधे यांनी दीड एकरात पपईच्या 1900 झाडांची लागवड केली.

बागेवर आजवर 60-70 हजार रुपये खर्च झाला. फळधारणा चांगली झाली; परंतु गेल्या पंधरवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या जोरदार पावसाचा पपईबागांना चांगलाच फटका बसला. बहुतांश झाडांची फुलगळती झाली. त्यात फळे खराब झाल्याचे सांगून व्यापारी बाग घेत नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या म्हस्के व रिंधे कुटुंबीयांनी बाग तोडण्याचा निर्णय घेतला. सध्या बागेवर कुऱ्हाड चालविली जात असून, बहुतांश झाडे तोडली आहेत. 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे पंचनामे करीत आहोत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे. पपई हे फळवर्गीय पीक असले, तरी महसूल अधिकारी संबंधित क्षेत्राची पाहणी करतील. 
- रूपेश सुराणा, तहसीलदार, नेवासे 

गेल्या दीड-दोन वर्षांत चांगला पाऊस व पाटपाण्याचे चांगले नियोजन केल्यामुळे, यंदा चांगले पाणी होते. त्यामुळे पपईची लागवड केली. त्यातून साडेतीन-चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. 
- राजेंद्र म्हस्के, युवा शेतकरी, कुकाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The papaya orchard in Nevasa was uprooted