
पारनेर : मांडओहोळचे पाणी राखीव
पारनेर: मांडओहोळ धरण परिसरातील वीज आठ दिवसांसाठी सुरळीत करण्यात येणार आहे. त्यामुळे धरण परिसरातील रब्बी पिकांना जीवदान मिळणार आहे. याबाबत आमदार नीलेश लंके यांच्याकडे शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्यावर तोडगा काढत, पिकांसाठी आठ दिवस पाणीउपशास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय आज (ता. १०) झालेल्या अधिकाऱ्यांच्या टंचाई आढावा बैठकीत घेण्यात आला.
तहसील कार्यालयात आमदार लंके यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या टंचाई बैठकीस प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कावरे उपस्थित होते.तालुक्यातील आठ गावांचे टँकरचे प्रस्ताव दाखल झाले होते. त्यांपैकी पिंपरी पठार, घाणेगाव, वेसदरे या तीन गावांतील टँकर मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय पळसपूर, ढगेवाडी, कान्हूर पठार, डोंगरवाडी व बाभूळवाडे येथील ठाकरवाडी येथील टँकरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हसणे, पुणेवाडी, विरोली, पिंपळगाव रोठे व पळवे खुर्द या गावांचीही टँकरची मागणी आहे. मात्र, या गावांच्या मागणी प्रस्तावात काही त्रुटी आहेत, तर काही ठिकाणी प्रत्यक्षात पाणी आहे किंवा काय याची तपासणी करणे बाकी आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येतही वाढ होत आहे. आजअखेर एकूण तेरा गावांचे टँकरमागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, धरण परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, यासाठी भाजपचे युवा नेते सुजित झावरे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
वीजजोडासाठी पाठपुरावा
मांडओहोळ धरणातील पाणी पिण्याकरिता राखून ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन दिवसांपूर्वी या परीसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. त्यामुळे धरण परिसरातील रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली होती. हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी आमदार लंके यांच्याकडे या परीसरातील शेतकऱ्यांनी केली होती. हातातोंडाशी आलेले पीक विजेअभावी जळून जाते की काय, ही भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरपंच प्रकाश गाजरे यांच्यासह शेतकऱ्यांनी आमदार लंके यांची भेट घेतली होती.
Web Title: Parner Mandohol Water Reserved
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..