राष्ट्रवादीच्या आमदारांना फुटले रडू...म्हणाले, अनिलभैयांचा मला आमदारकीसाठी आशिर्वाद होता

अशोक निंबाळकर
Thursday, 6 August 2020

सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने अनेकांना माजी आमदार अनिल राठोड यांच्याअंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. राठोड यांच्या जनसंपर्काचे कौतुक केवळ शिवसैनिकांना नव्हते तर इतर पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही होते.

अहमदनगर : शिवसेनेचा नगरचा वाघ म्हणून ख्याती असलेले माजी आमदार अनिल राठोड यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य नगरकरांना मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अकाली जाण्याने दुःख व्यक्त केले. राठोड हे शिवसेनेची बुलंद तोफ होते. कडवा शिवसैनिक म्हणून त्यांची ख्याती कायम राहील.

सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने अनेकांना माजी आमदार अनिल राठोड यांच्याअंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही. राठोड यांच्या जनसंपर्काचे कौतुक केवळ शिवसैनिकांना नव्हते तर इतर पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही होते. मोबाईल आमदार, हाकेला धावून जाणारा नेता हे बिरूद आत्ता आले, परंतु मोबाईल येण्याच्या अगोदरपासून राठोड हे काम करीत होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी शिवसेनेसह इतरही पक्षातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली ती पारनेरचे आमदार नीलेश लंके यांची. 

राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करताना लंके रडू फुटले. राठोड यांच्या आठवणी सांगताना लंके म्हणाले, अनिलभैया हे इतरांप्रमाणेच माझ्यासाठीही प्रेरणा होते. त्यांच्याकडून आम्ही खूप गोष्टी शिकलो. मी राष्ट्रवादीकडून उभे असतानाही त्यांचा मला आशिर्वाद होता. त्यांच्या आशिर्वादामुळेच मी आज आमदार झालो आहे. लंके यांच्या मनात राठोड यांच्याबद्दल असलेली कृतज्ञतेची भावनाही दिसून आली.

लंके यापूर्वी शिवसेनेत होते. पारनेरचे तत्कालीन आमदार विजय औटी यांच्यासोबत त्यांचे मतभेद झाल्याने लंके राष्ट्रवादीत गेले. पहिल्याच निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parner MLA Nilesh Lanka wept over the death of former MLA Anil Rathore