esakal | ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, शेवटी तहसीलदारांनीच दिला अग्निडाग

बोलून बातमी शोधा

Parner tehsildar cremated the old man
ह्रदयद्रावक ः दोन्ही मुले नाही आली, तहसीलदारांनीच दिला अग्निडाग
sakal_logo
By
टीम ई सकाळ

पारनेर ः कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीसही आप्तांंचा हात लागत नाही. मुलगा असो नाही तर मुलगी कोणाचाही आई-वडिलांना खांदा देता येत नाही. पारनेर तालुक्यातही असाच प्रसंग ओढावला.

कोरोनामुळे निधन झालेल्या किन्ही येथील एका वृद्धाचे निधन झाले. अंत्यविधीस जवळच्या कोणालाही येता आले नाही. एक मुलगा पुणे येथे रूग्णालयात व तर दुसरा मुंबई येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडला आहे.

जवळचे कोणीच न आल्याने पारनेर प्रशासनाच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मृतदेहास तहसीलदार ज्योती देवरे यांनीच पुढाकार घेत अग्निडाग दिला. तहसीलदार देवरे यांनी दाखवलेल्या मानवतेमुळे उपस्थितही हेलावून गेले.

काल (ता. १९ ) सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास तहसीलदार देवरे यांनी प्रशासनाच्या वतीने त्या वृद्धावर अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीमुळे व प्रशासनाच्या प्रमुख या नात्याने देवरे यांनीच अग्निडाग दिला.

मागील आठवड्यात त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कर्जुले हर्या येथील मातोश्री कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. काही काळ त्यांना उपचारास चांगला प्रतिसाद दिला. मात्र, नंतर त्यांची प्रकृती खालावली. शनिवारी मातोश्री रूग्णालयाचे संचालक डॉ. दीपक आहेर यांनी त्या वृद्धाच्या मुलास फोन करून वडिलांची प्रकृती खालावली असल्याचे कळविले होते. मात्र, ते येऊ शकले नाहीत.

काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खोडदे यांचे निधन झाले. रूग्णालयाच्या वतीने वडिलांचे निधन झाल्याचे मुलास कळविले मात्र तो न आल्याने डॉक्टरांनी या बाबतची माहिती प्रशासनास दिली.

कोरोना बाधिताचा मृतदेह अधिक काळ ठेवणे धोकादायक असल्याने तहसीलदार देवरे यांनी मृतदेह पारनेर येथे पाठविण्याच्या सूचना दिल्या. मुलास तसे कळविले. मात्र, त्याने मला लॉकडाऊनमुळे येणे शक्य नसल्याचे सांगितले.

दुस-या मुलांन मी रूग्णालयात उपचार घेत असल्याने मला येता येणार नाही, असे कळविले. अशा कोरोनाच्या गंभीर स्थितीत ग्रामस्थ किंवा नातेवाईकही अंत्यविधीस येऊ शकत नसल्याने प्रशासनाच्या वतीने अंत्यविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारनेर येथील अमरधाममध्ये सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.

या वेळी तहसीलदार देवरे यांच्यासह पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, नगरपंचायतीचे सचिन राजभोज, मंडलाधिकारी सचिन पोटे, पारनेरचे तलाठी अशोक लांडे, हवलदार भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.

ह्रदय हेलावणारा क्षण

हा क्षण हृदय हेलवाणारा होता. माझे काहीही नाते संबध नसतानाही त्या वृद्धावर अंत्यसंस्कार करताना व अग्निडाग देताना अक्षरशः रडू कोसळले. अनेक कुटुंब उद्धवस्थ होत आहेत. तरूण वयोवृद्ध आपल्यातून कायमचे निघून जात आहेत. आता तरी जनतेने भानावर यावे स्वतः तसेच कुटुंबाच्या व समाजाच्या सुरक्षततेसाठी काळजी घ्यावी. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.

- ज्योती देवरे, तहसीलदार.

(बातमीदार - मार्तंड बुचुडे)