Parner Vidhansabha Election : आमदारकीसाठी राणी लंकेंच्या नावाची चर्चा

नीलेश लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या सर्वाधिक दावेदार राहणार
Rani Nilesh Lanke
Rani Nilesh Lankesakal

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नीलेश लंके यांचा विजय झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील विधानसभेची गणिते मात्र बदलली आहेत. राणी लंके यांच्या नावाची विधानसभेसाठी चर्चा सुरू झाली आहे.

नगर दक्षिणचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार नीलेश लंके यांनी पराभव केला. लंके नगर दक्षिणचे खासदार झाल्याने तालुक्याचे राजकारण बदलले आहे. त्यामुळे विधानसभेची गणिते बदलली आहेत.

लंके यांच्या जागेवर त्यांच्याच पक्षाच्या वतीने त्यांच्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्या राणी लंके या सर्वाधिक दावेदार राहणार आहेत. कारण लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेच भावी आमदार म्हणून राणी लंके यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.

अनेक कार्यक्रमांमधून व सोशल मीडियावरही भावी आमदार, अशी उपाधी त्यांना जोडली गेली आहे. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. त्याही वेळी भावी आमदार असेच त्यांना संबोधण्यात आले होते. त्यामुळे सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राणी लंके ह्या विधानसभेच्या मुख्य दावेदार आहेत. या शिवाय या पक्षाकडून इतर कोणी फारसे इच्छुक दिसत नाहीत.

तालुक्यात सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपकडे होती. त्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशीनाथ दाते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, तसेच युवा नेते विजय सदाशिव औटी आदी नेते मंडळी विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, डॉ. विखे यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवामुळे अनेक जण आता विधानसभेच्या रिंगणातून अंग काढून घेणार आहेत, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

याशिवाय शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षातून बडतर्फ केलेले तालुक्याचे माजी आमदार विजय भास्कर औटी हे सुद्धा विधानसभेसाठी पुन्हा एकदा रिंगणात येऊ शकतात, तसेच त्यांच्याच सोबत असलेले व शिवसेना ठाकरे गटाचेच पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

असे असले, तरीही अता आगामी काळात कोणत्या पक्षाची कोणासोबत आघाडी होणार किंवा युती होणार, यावर बरचशी गणिते अवलंबून आहेत. त्याचबरोबर आयत्या वेळी पारनेर तालुक्यातील नवीन चेहराही अचानक समोर येऊ शकतो.

मात्र, सध्या तरी तालुक्यातील राजकारणावर एकहाती लंके यांचे वर्चस्व निर्माण झाल्याने ते आता तालुक्यात आपल्याच पक्षाचा आमदार केल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकेच खरे आहे.

लंकेंना १ लाख ३० हजार मते

मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यावेळी डॉ. विखे यांना एक लाख १७ हजार ८१, तर जगताप यांना ८०३७२ मते पारनेर विधानसभा मतदारसंघातून मिळाली होती.

त्यावेळी विखे यांना ३६ हजार ७०९ मतांची आघाडी मिळाली होती, तर यावेळी २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत झाली.

या वेळी पारनेर तालुक्यात लंके यांना एक लाख तीस हजार चारशे चाळीस, तर डॉ. विखे यांना ९२ हजार ३४० मते मिळाली. त्यामुळे यावेळी तालुक्यातील मतदारांनी पारनेरचा स्थानिक उमेदवार व विद्यमान माजी आमदार या नात्याने लंके याना पारनेर तालुक्यातून ४८ हजार १०० मतांची आघाडी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com